लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात, विशेषत: मुंबई महानगर परिसरात पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट आहे. पोलिसांना हक्काची घरे उपलब्ध होताना अडथळे येत आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिसांसाठी राखीव घरे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना साडेचार हजार घरे उपलब्ध झाली आहेत. विशेष बाब म्हणजे सिडकोमध्ये प्रथमच पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्यात आली आहेत.पोलिसांसाठी राखीव ठेवलेल्या घरांच्या आॅनलाइन नोंदणीला २७ जुलैपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आॅनलाइन सोहळ्यात या नोंदणीला सुरुवात होणार आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांमध्येही पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. त्यानुसार नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोड्समध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये एकूण ४४६६ सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व अल्प उत्पन्न गटासाठी या सदनिका उपलब्ध असून केवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी त्या राखीव आहेत. मासिक उत्पन्न २५ हजार रुपयांपर्यंत आणि मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपर्यंत अशा दोन गटांमध्ये या सदनिका असून त्यांची किंमत किमान १९ लाख ते कमाल ३१ लाख आहे.२७ जुलैपासून सुरू होणारी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया महिनाभर २७ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि या २८ जुलै ते २८ आॅगस्ट या कालावधीत होणार आहे. सेवाकाळात सरकारी घरांमध्ये राहणाºया पोलिसांच्या कुटुंबीयांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. त्यांना मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाºया घरांच्या योजनेत पोलीस कर्मचाºयांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पोलिसांना मिळणार साडेचार हजार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 1:12 AM