ठाणे : ठाणे शहरातील पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तडकाफडकी घरे रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्यामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्यासाठी माजी महापौर नरेश म्हस्के व माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग व पोलीस उपायुक्त प्रवीण पवार यांची पोलिसांच्या कुटुंबीयांसमवेत भेट घेतली. यावेळी प्रथम पोलीस कुटुंबीयांचे पुनर्वसन झाल्याशिवाय त्यांना घराबाहेर काढू नये, असा निर्णय घेतल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तडकाफडकी घरे रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी म्हस्के यांनी पोलीस आयुक्त सिंग यांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस वसाहत आहे. या वसाहतीतील इमारतींची देखभाल, दुरुस्ती बांधकाम विभागाकडून न झाल्यामुळे इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे ६५० ते ७०० कुटुंबांना अचानक घरे रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्यामुळे त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील अनेकांची मुले ठाणे शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, शहरात नोकरी करत आहेत. त्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.