मीरारोड - बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करायची असेल तर पोलिसांना दर महिन्याला ८ हजार हप्ता देऊन बिनबोभाट गुटखा विक्री करू शकता. भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यातील हवालदारास त्याच्या दोन पंटर सह १० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. राज्यात गुटखा बंदी असून त्याची विक्री, साठा, तस्करी आदी कायद्याने गुन्हा आहे. परंतु मीरा भाईंदर शहरात गुटखा विक्री पण टपऱ्या पासून दुकानातून होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. काही प्रकरणात गुन्हे दाखल केले गेले आहेत. तसे असले तरी शहरात सर्रास बंदी असलेला गुटखा विकला जातोय.
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय तक्रारदाराचे भाड्याचे जनरल स्टोर आहे. तो पूर्वी गुटखा विक्री करत होता मात्र सध्या गुटखा विक्रीचा धंदा बंद केला आहे. तरीदेखील पोलीस हवालदार अमित एकनाथ पाटील (३८) ह्याने तक्रारदाराकडे गुटखा विक्रीचे मागील महिन्याचे ८ हजार आणि चालू महिन्याचे ८ हजार असे १६ हजार मागितले. २७ मार्च रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्वप्नील जुईकर सह परदेशी, पवार, निवले, पारधी, शेख, सांबरे यांच्या पथकाने पडताळणी सुरु केली.
पडताळणीत अमित पाटील समोर त्याचा पंटर संजय यादव याने तक्रारदारा कडे पैश्यांची मागणी केली . तर पुढील बोलणी अमित मिश्रा याच्याशी करण्यास त्याने सांगितले. तडजोडी अंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवार २९ मार्च रोजी मिश्रा याला गौरवधर्म काटा येथील कार्यालयात १० हजार रुपये घेताना पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर हवालदार अमित पाटील याला देखील अटक केली. तर पंटर संजय यादव हा पसार झाला आहे. नवघर पोलीस ठाण्यात ह्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या ग्रुपमध्ये आरोपी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा पत्रकारांसाठी पीआरओ व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुप मध्ये अमित मिश्रा ला पोलिसांनीच समाविष्ट केले असल्याचे आढळून आले. या आधी देखील एक कथित पत्रकारला खंडणीच्या गुन्ह्यात भाईंदर पोलिसांनी पकडला होता . तो सुद्धा पोलिसांच्या पीआरओ ग्रुप मध्ये होता.