ठाणे - जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील पालकांनी त्यांच्या शून्य ते पाच वयोगटांतील दोन लाख चार हजार ५५० बालकांना पोलिओ डोस आवश्यक पाजावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, आरोग्य व बांधकाम सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे.या पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याबाबत त्यांनी सूचित केले. या मोहिमेदरम्यान उपसंचालक ठाणे मंडळ डॉ. गौरी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे. रविवारनंतरही पुढील पाच दिवसांत बुथवरील लाभार्थी व्यतिरिक्त उर्वरित लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.पल्स पोलिओ मोहिमेपुढील आव्हानठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूरसह भिवंडी परिसरात आदिवासी पाडे मोठ्या संख्येने आहेत. सध्या कोरोना काळ सुरू असल्याने दुर्गम आदिवासी पाड्यातील बालकांना डोस पाजण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.कोविडच्या भीतीने अनेक पालक अंगणवाड्यांत आपल्या मुलांना पाठवीतच नसल्याने त्यांचा शोध घेऊन डोस पाजणे अंगणवाडी सेविकांसह आशा वर्करसमोर मोठे आव्हान आहे. आधीच कोविड काळात या सेविका, आरोग्यसेवक पोषण आहार पुरविताना हैराण झाल्यात. जिल्ह्यातील संबंधितांना या मोहिमेबाबत सर्व स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील सर्व ० ते ५ वयोगटांतील बालकांच्या पल्स पोलिओ लसीकरणाची तयार पूर्ण केली आहे.- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी
ठाणे जिल्ह्यात २,०४,५५० बालकांना आज पोलिओ डोस; आराेग्य यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 1:04 AM