- कुमार बडदे
मुंब्रा : गोवर-रु बेलाची लस दिल्याने मुले दगावतात, मुलांच्या प्रजननक्षमतेवर विपरित परिणाम होतो, अशा अफवा मुस्लिमबहुल मुंब्रा शहरात पसरल्याने या लसीकरण मोहिमेला मोठा हादरा बसला आहे. बुधवारी ज्या शाळेत हे लसीकरण होते, तेथील ८० टक्के विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला दांडी मारली.
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने हाती घेतलेली ही लसीकरण मोहीम हाणून पाडण्याकरिता अन्य राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर ही लस घेतल्याने मुले दगावतात, येथपासून मुलांची प्रजननक्षमता कमी होते, अशा अफवा पसरवल्याचे बोलले जाते. मुस्लिम समाजातील मुले वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात, म्हणून या परिसरात लसीकरणाची सर्वाधिक गरज असताना तेथेच पसरलेल्या अफवांमुळे या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाच्या दिवशी शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहत असल्याने शिक्षकवर्ग चक्रावून गेला आहे. मंगळवारपासून येथील शाळांमध्ये गोवर-रु बेला लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीमुळे होणारे फायदे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी महिनाभर शाळांमध्ये जाऊन डॉक्टरांनी पालक-विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. तसेच शाळाशाळांमध्ये पोस्टर, बॅनर लावून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. मात्र, यानंतरही सदर लसीमुळे मुले दगावतात, लस घेतल्यानंतर उलटी होते तसेच लसीमुळे भावी पिढीच्या जननक्षमतेवर परिणाम होतो, अशा अफवा पसरल्याने पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत. लसीकरण करणाऱ्यांनी पालकांना गाठून लस देण्याचा आग्रह केला, तरी ते लस देण्यास तयार होत नाहीत. लसीकरण सुरू असेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याकडे बहुतांश पालकांचा कल असल्याची माहिती पद्मा दुबाल्ली या महिलेने दिली.
मंगळवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी नूतन शाळेत उपस्थित असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांनी लस घेण्यास नकार दिला. मोहिमेच्या दुसºया दिवशी येथील रेल्वेस्थानकाजवळील सेंट जॉन हायस्कूलमधील तब्बल ८० टक्के विद्यार्थी लसीकरण असल्याने आले नसल्याची माहिती शाळेतील एका शिक्षिकेने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाºयाने मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी लसीकरणाकरिता जबरदस्ती करू नका, अशा शब्दांत उपस्थित डॉक्टरांना दमदाटी केल्याची माहिती त्या शिक्षिकेने ‘लोकमत’ला दिली.खासगी डॉक्टरकडून लस घेण्याचा आग्रहठाणे : ठाण्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी गोवर-रुबेलाची लस खासगी डॉक्टरांकडून देण्याची इच्छा व्यक्त केल्याने अशा पालकांना तसा पर्याय शाळांनी दिला आहे. अर्थात, बाहेर ही लस देणे खर्चिक आहे. या लसीविषयी काही पालकांनी पालकसभेत प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे काही शाळांनी पालकांकडून नाहरकत लिहून घेतली. लसीकरणावेळी लहान मुलांसोबत पालकांनी येणे ठाण्यातील शाळांतही सक्तीचे केले आहे. एखाद्या मुलाला फिट येत असेल किंवा इतर आजार असेल, तर त्यांनी पालकांना सोबत आणण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बिलॉबाँग शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी चौधरी यांनी सांगितले. आजारी मुलांनी पालकांना आणणे अनिवार्य केल्याचे ‘सरस्वती’चे मुख्याध्यापक यशवंत शिंदे यांनी सांगितले. बेडेकर शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ आणि ‘श्रीरंग’चे सेक्रेटरी प्रमोद सावंत यांनीही याचे अनुमोदन केले.