अंबरनाथ: अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. या उत्सवाच्या समारोपाच्या भाषणात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी राजकीय टोलेबाजी करीत नाव न घेता स्व पक्षाच्या आमदारांना टार्गेट केले.दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय टोलेबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. उपस्थित गोविंदा पथकाना मार्गदर्शन करताना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी कोणाचेही नाव न घेता आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच चिमटा काढला. दहीहंडी फोडताना खालचा गोविंदा पथकांचा थर भक्कम असला तर सहज लोणी खाता येते. अंबरनाथमध्ये आपल्या सहकाऱ्यांमुळे शिवसेनेची भक्कम बांधणी झाल्यामुळेच खालचा थर भक्कम झाला. त्यामुळेच दहीहंडीपर्यंत पोहोचता आले. खालचा थर मजबूत होता म्हणूनच लोणी खाता आले. आता यापुढे देखील हा खालचा थर किती भक्कम आहे हे आम्ही दाखवून देऊ असा टोला वाळेकर यांनी लगावला.
अंबरनाथ शहरात शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर असे दोन गट असून हे दोन्ही गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असले तरी त्यांच्यात बिलकुल जमत नसल्याचा प्रत्येक वेळी दिसून आला आहे. त्यामुळे एकमेकांना टारगेट करून राजकीय टोलेबाजी करण्यात कोणीही कमी पडत नाहीत. आमदार किणीकर यांचा गट शहरात सक्रिय होत असतानाच शहर प्रमुख वाळेकर यांनी देखील आपल्या पदाधिकाऱ्यांसह आपली ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन बड्या दिग्गज स्थानिक नेत्यांमुळे शिवसेनेतील कार्यकर्ते देखील दुभागले आहेत. दहीहंडीच्या निमित्ताने वाळेकर यांनी आमदारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी किती शिगेला पोचली आहे याचा प्रत्यय अंबरनाथकरांना आला.