पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील बी.जी. छाया या उपजिल्हा रुग्णालयात शासकीय लसीकरण मोहीम सुरू होती. या लसीकरण मोहिमेत राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक्षेप वाढल्याने आणि डॉक्टरांवर दबावतंत्राचा वापर वाढल्याने या ठिकाणची टोकन सिस्टिम बंद करून सर्व लसीकरण मोहीम आता ऑनलाईन करण्यात आली आहे. या ऑनलाईन यंत्रणेमुळे अंबरनाथच्या बाहेरील नागरिकांनाच लसीकरणाचा लाभ होत आहे. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने लसीकरणापासून अंबरनाथकरांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.
राज्य शासनाच्या छाया उपजिल्हा रुग्णालय येथे शासकीय लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीपासून याठिकाणी टोकन सिस्टिमद्वारे लसीकरण करण्यात येत होते. २० टक्के लसीकरण ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना तर ८० टक्के लस ऑफलाइन अर्थात टोकन सिस्टिमने करण्यात येत होती. याठिकाणी सुरुवातीपासून टोकन मिळविण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना सतत त्रास देत होते. आपल्या मर्जीतील नागरिकांना लस मिळावी यासाठी मिळेल तेवढे टोकन उचलण्याचा प्रयत्न केला जात होता. अनेक नगरसेवकांनी टोकन घेण्यासाठी काही मुलांना कामावर देखील ठेवले होते. टोकन मिळाल्यानंतर त्याचे वाटप प्रभागांमध्ये करून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली जात होती. टोकनमध्ये होणारा गैरव्यवहार टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने एका व्यक्तीला एकच टोकन देण्याची मोहीम राबवली; मात्र त्याचा सर्वाधिक फटका हा राजकीय पुढाऱ्यांना बसला. त्यामुळे छाया रुग्णालयाचे डॉक्टर आणि काम करणाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरू केला. डॉक्टर आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लसीकरणासाठी दबाव टाकण्यात येत असल्याने आणि अपशब्द वापरले जात असल्याने रुग्णालय प्रशासनाने टोकन सिस्टिम बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय पुढाऱ्यांची लसीकरण केंद्रावरील दादागिरी आणि वशिलेबाजीला कंटाळून रुग्णालय प्रशासनाने आता सर्व लसीकरण मोहीम ऑनलाइन राबवली आहे.
----------
जोड
ऑनलाइन नोंदणीमुळे अंबरनाथकरांवर अन्याय
टोकन सिस्टिम बंद करून ऑनलाइन नोंदणी केलेल्यांनाच छाया रुग्णालयात लसीकरण करण्यात येत असल्याने या लसीकरणाचा लाभ आता बाहेरील नागरिकांना सर्वाधिक होत आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्यांपैकी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणच्या नागरिकांचा सर्वाधिक भरणा आहे. अंबरनाथमधील मोजक्याच नागरिकांचे ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरण होत आहे. या ऑनलाईन नोंदणीमुळे अंबरनाथ ऐवजी बाहेरील शहरातील नागरिकांचे लसीकरण होत आहे, तर स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे.