राजू काळे, भार्इंदरमुंबई महापालिकेने निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्यानंतर हे कंत्राटदार मीरा-भार्इंदर पालिकेत राजकीय मध्यस्थीने कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे शहरात निकृष्ट दर्जाच्या कामांना ऊत आला असून कोट्यावधींचा निधी पाण्यात जात आहे.मीरा-भार्इंदर पालिकेनेही यापूर्वी काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांनी विविध नावांनी पुन्हा कंत्राटे मिळवून आपला उद्देश साध्य केला आहे. एका कंत्राटदाराला नियमानुसार मिळालेले काम तो टक्केवारीने इतर कंत्राटदाराला देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो. यात रुग्णालयापासून ते रस्त्यापर्यंची कामे निकृष्ट दर्जामुळे काही महिन्यातच चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. पालिकेने चार मजली जोशी रुग्णालयाच्या बांधकामाचे कंत्राट मे. किंजल कंस्ट्रक्शनला दिले होते. परंतु, या मूळ कंत्राटदाराने टक्केवारीवर बांधकामाचे काम प्रत्यक्षात रतनसिंग नावाच्या कंत्राटदाराच्या आर अॅन्ड बी इन्फ्रा प्रोजेक्टस् कंपनीला दिले. ते सुरु होण्यापूर्वीच त्याला गळती लागल्याचे निदर्शनास आले. तत्कालिन आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार कंत्राटदाराला दुरुस्ती करण्यास भाग पाडण्यात आले. या कंपनीद्वारे शहरातील गटारे, नाले व रस्त्यांची कामे केली आहेत. काही महिन्यांतच त्यांचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाने अखेर आर अॅन्ड बी कंपनीला काळ्या यादीत टाकले. २०१२ मध्ये याच कंत्राटदाराने नालेसफाईमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पालिकेने ३४ कोटींचा दंड कंपनीला ठोठावला होता. तसेच गटारे, नाले व रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी अनेक नोटीसाही बजावल्या. तत्पूर्वी मुंबई महापालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. तरीदेखील मीरा-भार्इंदर पालिकेने या कंत्राटदाराला कामे दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या कंत्राटदराला ठाणे महापलिकेद्वारे गटारे व नाल्यांचे काम देण्यात आले आहे. त्यातही निकृष्ट दर्जा उघडकीस आल्याने पालिकेने त्याला नोटीस बजावल्याचे समजते. काळ्या यादीत समावेश झाल्यानंतर नेहमीप्रमाणे या कंत्राटदाराने एमई नामक नवीन कंपनी सुरु करुन शहरातील कामे पुन्हा मिळविण्यास सुरुवात केली. अलिकडेच भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम मिळवून ते स्थानिक लोकप्रतिनिधीला टक्केवारीवर दिले आहे. बांधकाम सुरु असतानाच इमारतीचा सज्जा ढासळल्याने त्यातील कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा चव्हाट्यावर आला.
मीरा-भार्इंदर पालिकेत राजकीय मध्यस्थीने कार्यरत
By admin | Published: October 06, 2016 3:08 AM