ठाणे : कळव्यातील पाणीटंचाईच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देणाऱ्या राजकीय पक्षांनी तूर्तास आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने शटडाऊनच्या वेळा बदलण्याबरोबरच कळव्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपने बुधवारी काढण्याचा येणारा मोर्चा स्थगित केला आहे. तर पाणी वितरण व्यवस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्यांची पूर्तता करण्यासाठी २८ डिसेंबर ही डेडलाइन दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चा काढणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. ठाण्यात सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीकपातीच्या विशेष झळा या कळव्यातील नागरिकांना अधिक सोसाव्या लागत असल्याने ते संतप्त झाले आहेत. दोन दिवसांचा शटडाऊन चार दिवसांवर जात असल्याने पाणी साठवून किती ठेवायचे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भाजपने बुधवारी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र मंगळवारी नगरसेवक संजय वाघुले, माजी उपमहापौर अशोक भोईर यांच्यासह कळव्यातील काही नागरिकांची कळवा प्रभाग समिती कार्यालयामध्ये एक बैठक झाली असून यामध्ये वितरण व्यवस्थेमध्ये बदल करण्याचे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. मागील दोन दिवसांमध्ये सुधारणादेखील झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मोर्चा रद्द केल्याची माहिती वाघुले यांनी दिली.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने २८ डिसेंबर ही डेडलाइन दिली आहे. कळव्यातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्याबरोबरच ठाणे महापालिकेने इतरांवर अवलंबून न राहता स्वत:चे पाण्याचे स्त्रोत निर्माण करावे अशी मागणी पक्षाने केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कळव्यासाठी मुबलक पाणी देण्याची मागणी करण्यात आली असून यामध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
राजकीय पक्षांचे आंदोलन तूर्तास मागे
By admin | Published: December 23, 2015 12:36 AM