लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या निरंतर पुनरिक्षण मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र मिळविण्यासाठी, दुबार किंवा समान नोंदी कमी करण्यासाठी, मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील राजकीय पक्षांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात लवकरच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी उपयुक्त ठरणारा मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे छायाचित्रांसह निर्दोष मतदार यादी प्रसिद्ध करणे, मतदान केंद्र सुसूत्रीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, छायाचित्र ३१ ऑक्टोबरपूर्वी तपासून घ्यावे. ज्यांची नावे आहेत मात्र छायाचित्र नाही किंवा तपासणीदरम्यान व्यक्ती त्या ठिकाणी वास्तव्यास नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये सहा लाख ११ हजार मतदारांचे छायाचित्र नाही. या छायाचित्र नसलेल्या याद्यांची जिल्ह्यात तपासणी केली जात आहे. या मतदारांनी आपले छायाचित्र उपलब्ध करून द्यावे. यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
या बैठकीला निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, शिवसेनेचे विलास जोशी, अनिल भोर, अमोल नवले, भारतीय जनता पक्षाचे कैलास म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नैनेश पाटणकर, बहुजन समाज पार्टीचे जमना कोरी आदी उपस्थित होते.
बीएलए नेमण्याच्या सूचना
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे, तेथे बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नेमण्याची कार्यवाही सर्व राजकीय पक्षांनी करावी, असे मार्गदर्शनही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.
-------------