ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौरस फुटांच्या मालमत्तांना सरसकट करमाफी देण्याचे वचन दिले होते. प्रत्यक्षात केवळ सामान्य करमाफी देऊन ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यावर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना सरसकट नव्हे तर केवळ ३५ टक्केच सवलत मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे गुरुवारी ठाणे भाजपच्या वतीने झुठा है तेरा वादा....... सांगितले १०० टक्के, दिले फक्त ३१ टक्के अशा आशयाचे फलक ठाणे शहरात लावून कर माफीचे वचन देणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे. येत्या काळात या मुद्यावरून मोठा राजकीय संघर्ष ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे.
२०१७ साली पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने ठाणेकरांना ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफीचे वचन दिले होते. प्रत्यक्षात मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही केवळ सामान्य कर माफ करण्यात आला आहे. याच मुद्यावरून आमदार निरंजन डावखरे यांनी शिवसेनेने ठाणेकरांच्या विश्वासघाताची वचनपूर्ती केली आहे, अशी टीका केली. त्यावर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. ३५ टक्के करमाफी हेही नसे थोडके या थाटात त्यांनी सवलतीचे गणित मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर महागाईची दाखले देत मालमत्ता करात दिलेल्या ३५ टक्के करमाफीमुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला असल्याचा दावा करत स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न
अंशतः सरकारने अंशतः करून दाखवलं...मुंबईत सरसकट करमाफी दिली जाऊ शकते तर ठाण्यात का नाही? नागरिकांना जी मालमत्ता कराची बिलं पाठवली जात आहेत त्यावर अंशतः करून दाखवलं, असं लिहून पाठवा, असा टोला भाजपचे ठाणे उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी लगावला. झुठा है तेरा वादा....... सांगितले १०० टक्के, दिले फक्त ३१ टक्के अशा आशयाचे फलक शहरात लावून त्यांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.