ठाणे : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला आहे. दरम्यान, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्या विधानावरून विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले.
आव्हाड यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला असल्याने त्यांच्याविरुद्ध चोवीस तासांत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलन आणि इशारा- ठाण्यातील सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. तर आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. - कल्याण येथे शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तर आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.- आव्हाडांना यांच्यावर आमदार निरंजन डावखरे टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे. त्यांच्या भूमिकेला त्यांचे समर्थन आहे का, असा सवाल केला आहे.