लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत सावध करीत असताना दुसरीकडे सत्तेत आणि विरोधात असलेल्या राजकीय पक्षांकडूनच कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. डोंबिवलीत रविवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने याची प्रचीती पुन्हा आली आहे. कोरोना नियमांची सक्ती सर्वसामान्यांनाच का, असा सवाल हे चित्र पाहून केला जात आहे.
नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात खाजगी कार्यालये, हॉटेल, दुकाने, मॉल, उद्याने, मैदाने खुली करताना व्यावसायिक आणि नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे बंधन घातले गेले आहे. सध्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर सर्वसामान्यांकडूनही कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे, तसेच नागरिकांना उपदेश देणारे राजकारणीही सर्रास नियम धाब्यावर बसवीत आहेत. ही कृती सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे. ऑगस्टच्या मध्यात भाजपने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. गर्दी जमा करणे, मास्कचा वापर न करता कोरोना वा जीवितास धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजपचे माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, कोरोना नियम मोडणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस यंत्रणेने मनसेसह आता राष्ट्रवादीचीही नजरेआड केलेली गर्दी चर्चेचा विषय ठरली आहे.
आव्हाडांचा इशारा गांभीर्याने घेणार का?
डोंबिवलीतील फडके मार्गावर मनसेच्या डोंबिवली शहर शाखेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्कही नव्हते. रविवारी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही हेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधकांसाेबतच राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीलाही कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचे स्पष्ट होत आहे. गर्दी पाहून मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळातील राष्ट्रवादीच्या झंझावाताची आठवण झाली. त्याचवेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बेफिकीर राहू नका, असा सूचक इशाराही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. हा इशारा गांभीर्याने घेतला जातो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-------------- ----