ठाणे - लोकांची कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खदखद, क्रोध आहे. कामे होण्यासाठी लोक जनता दरबारामध्ये आपला रोष व्यक्त करतात. याला १० टक्के भ्रष्ट असलेले प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी दिली. नाईक ठाण्यातील जनता दरबारात बोलत होते. शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तक्रारदारांना न्याय देण्याचे काम व्हायला हवे, असे आदेश पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाईक यांनी दिले.
शुक्रवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नाईक यांचा जनता दरबार आयोजित केला होता. नाईक म्हणाले की, पालघरमध्ये दरबारातील ८० टक्के प्रश्न मार्गी लागले. नवी मुंबईतही असेच यश आले. ठाण्यात ६० टक्के यश आले.
...तर जनताच ठाण्याचा महापौर ठरवेल जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाचा महापौर होईल. यापूर्वीही नवी मुंंबई स्थापन झाल्यापासून गणेश नाईकांचा महापौर झाला. भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातही महापौर झाला. आता ठाण्यात निवडणुका लागतील, त्यावेळी बघू, असा अप्रत्यक्ष टोला नाईक यांनी शिंदेसेनेला लगावला. आपण महापौर पदाबाबतचा दावाही केला नाही तसेच इथे स्पर्धा नसल्याची सारवासारवही त्यांनी केली.