ठाणे : ठाण्यातील स्मशानभूमीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळत असतानाच, आता मुंब्य्रातील प्रस्तावित कबरस्तानच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. येथे कबरस्तान व्हावे, ही राष्टÑवादीची इच्छा आहे. परंतु, एमआयएम आणि शिवसेनेने यात खो घातल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्याची गरज नसल्याची भूमिका शिवसेनेने एमआयएमला हाताशी धरून घेतली आहे. त्यामुळे या मुद्यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मुंब्रा येथे असलेला एक तीन एकरचा भूखंड नवीन कबरस्तानसाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाला शिवसेना आणि एमआयएमने जोरदार विरोध केला. त्यांच्या साथीला भाजपाही धावून गेली आहे. नुकत्यात झालेल्या महासभेतदेखील हा विरोध प्रकर्षाने दिसून आला. परंतु, यावेळी नजीब मुल्ला, शानू पठाण आणि अनिता किणे यांनी जोरदार किल्ला लढवूनही हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. एकीकडे कबरस्तानच्या मुद्यावरूनच काही दिवसांपूर्वी एमआयएमने मुंब्रा बंदची हाक दिली होती. यामध्ये शिवसेनादेखील सामील होती. मात्र, नागरिकांनी हा बंद झुगारला होता. परंतु, आता सभागृहात आरक्षणाला विरोध करून एमआयएम राजकारण करत असल्याचा दावा राष्टÑवादीने केला आहे.मुंब्रा येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नाने एक कबरस्तान उभारण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येची अडचण होऊ नये, यासाठी सर्व्हे क्र मांक १०७ वरील तीन एकरचा शासकीय भूखंड कबरस्तानासाठी आरक्षित करण्याची मागणी त्यांनी केली होती. परंतु, महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. हा भूखंड आरक्षित ठेवण्यास एमआयएमने शिवसेनेच्या मदतीने विरोध केला आहे.एकूणच या माध्यमातून कबरस्तानच्या मागणीला हरताळ फासण्याचे काम एमआयएमने केले असल्याचा आरोप राष्टÑवादीने केला आहे. मात्र, यामागे राजकारण शिजत असल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्यावरून आव्हाडांना पुन्हा कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेनेने एमआयएमच्या मदतीने आखली आहे.आव्हाडांविरोधात मोर्चायेत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार असल्याने आतापासूनच शिवसेनेने अशा पद्धतीने पुन्हा आव्हाडांविरोधात मुंब्य्रात मोर्चा उघडला असून त्याचाच हा एक भाग असल्याची चर्चादेखील सुरू आहे.
मुंब्रा कबरस्तानावरून राजकारण पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:17 AM