मीरा रोड : सुटी असताना मीरा-भार्इंदर महापालिकेने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने एका संस्थेला दिलेल्या परवानगीवरून श्रेय व हद्दीचे राजकारण तापले आहे. पालिकेने क्रि केटची खेळपट्टी बनवण्याचे आदेश देऊनही या राजकारणामुळे कामच सुरू झालेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य इच्छुक मुलांना क्रि केटच्या प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. भार्इंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर प्रभाग ८, सरस्वतीनगरमागील आरक्षण क्र मांक १२२ क हे खेळाच्या मैदानासाठी राखीव आहे. या ठिकाणी पालिकेने खारफुटी व सीआरझेड क्षेत्रात बेकायदा मातीचा भराव टाकून मैदान विकसित केले आहे. मैदान विकसित व्हावे म्हणून काँग्रेसचे नगरसेवक दिनेश नलावडे, राजेश वेतोस्कर यांनी पाठपुरावा केला होता. या मैदानावर क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जावे म्हणून पालिकेने १५ जानेवारीला रायझिंग स्टार्स सपोर्ट फाउंडेशनला परवानगी दिली. त्यासाठी आवश्यक खेळपट्टीची कामे पालिकेने करून द्यायची असल्याने सृष्टी इन्फ्रास्ट्रक्चरला आदेश दिला. पालिका खेळपट्टीसाठी निधी खर्च करणार असली तरी त्या बदल्यात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण द्यायचे आहे. या संस्थेला प्रशिक्षण देण्याची परवानगी द्यावी व खेळपट्टीची कामे पालिकेने करावी म्हणून शिवसेना गटनेत्या नीलम ढवण यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. परंतु, ढवण स्थानिक नगरसेविका नसल्याने त्यांनी आमच्या प्रभागात नाहक ढवळाढवळ करू नये, असा सूर स्थानिक नगरसेवकांनी आळवला. तर, आपण सरस्वतीनगरमध्येच राहत असल्याने स्थानिक रहिवासी असल्याचे ढवण यांचे म्हणणे आहे. प्रशिक्षण देणारी संस्था व प्रशिक्षकाने स्वखर्चाने खेळपट्टी तयार करून प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी केली असता पालिकेने त्यास नकार दिला. पालिकेच्या खर्चातून खेळपट्टी बनवून द्यायची. वर त्यांना प्रशिक्षणाचे काम देणे, हे नुकसान असल्याचे नगरसेवक वेतोस्कर म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रशिक्षणावरून श्रेयाचे राजकारण तापले
By admin | Published: April 20, 2016 1:57 AM