मीरा रोड : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी दोन हजार ९६५ खाटांपैकी तब्बल एक हजार ८४९ खाटा रिक्त असतानाही १२ कोटी खर्चून मैदानात उभारल्या जाणाºया ७०० खाटांच्या कोरोना रुग्णालयास सत्ताधारी भाजपला उशिरा का होईना जाग आली. भाजपसह अपक्ष आमदार गीता जैन यांनी या वायफळ खर्चास विरोध दर्शवला आहे. यावरून आमदार प्रताप सरनाईक विरुद्ध भाजप, गीता जैन अशी जुंपली आहे.
भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात सुरुवातीला एक हजार खाटांचे रुग्णालय मंडप उभारून बांधणार, असे सांगितले होते. पण, आता ७०० खाटांचेच हे रुग्णालय असेल. १२ जुलैला जेव्हा या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली, तोपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बंदिस्त सभागृह, एमएमआरडीए योजनेतील, खाजगी विकासकांच्या इमारती, राधास्वामी सत्संगमधील मोठ्या शेड, रुग्णालये उपलब्ध झाली. असे असतानाही धारावी डेकोरेटर्स याला १० कोटी ३३ लाखांचे कंत्राट दिले. हा खर्च १२ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. २० दिवसांत कंत्राटदाराने मंडप व आतील व्यवस्था उभारून द्यायची होती. पण, अजून हे काम पूर्ण झालेले नाही.
आ. सरनाईक यांनी मैदानातील रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. याबाबत १८ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. कंत्राटदारास कार्यादेश मिळाला व त्यानंतरही काम सुरू होऊन आॅगस्ट संपायला आला, तरीही उघड विरोध असा केलाच नाही. सभापती अशोक तिवारी यांनी मात्र पत्र देऊन १२ कोटींचा अनावश्यक खर्च करू नका, असे आयुक्तांना कळवले होते. महापौर ज्योत्स्ना हसनाळे, भाजप नगरसेवक अॅड. रवी व्यास, सुरेश खंडेलवाल आदी नगरसेवकांनी हा खर्च वायफळ असल्याचे सांगून पालिकेच्या इंदिरा गांधी किंवा जोशी रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी खर्च करा, अशी मागणी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी रुग्णवाढ झाल्यास धावपळ होऊ नये यासाठी हे रुग्णालय बांधत आहोत, असे उपायुक्त संभाजी वाघमारे म्हणाले.एक हजार ८४९ खाटा रिक्तसध्या तीन कोविड केअरमध्ये एक हजार ८१६ रुग्णांची क्षमता आहे. परंतु, सध्या एक हजार २४० खाटा शिल्लक आहेत. तर, १४ रुग्णालयांमध्ये ५५८ खाटा असून त्यातील १८१ खाटा रिक्त आहेत. सात कोविड उपचार केंद्रांत ५९१ खाटा असून त्यातील ४२८ खाटा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या दोन हजार ९६५ खाटांपैकी तब्बल एक हजार ८४९ खाटा रिक्त असताना हा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.खर्च टाळल्यास बरे होईलअपक्ष आमदार गीता जैन म्हणाल्या की, सध्याची रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा पाहता या मैदानातील रुग्णालयावरचा खर्च टाळल्यास बरे होईल. १२ कोटी शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यावर खर्च केल्यास त्याचा सदुपयोग होईल.भाजपने केवळ भ्रष्टाचार केला : भाजपने पालिकेत सत्ता असताना केवळ भ्रष्टाचार केला असून नागरिकांच्या आरोग्याची काळजीच घेतली नाही. गीता जैन शिवसेनेच्या बळावर निवडून आल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आॅनलाइन उद्घाटन झाले तेव्हा होत्या. पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून कामे करून घेतात आणि आता कोविड रुग्णालयाला विरोध करतात, असे प्रताप सरनाईक म्हणाले.