मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपाने थेट राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर निवडणूक पुरते २५ दशलक्ष पाणी देऊन भाजपाने जनतेची फसवणूक केली आता स्वतःची पापे झाकण्यासाठी भाजपा कांगावा करत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना व काँग्रेसने दिले आहे .
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक काढले. खांबित यांनी त्यात शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळा कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ३० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे, असे म्हटले होते. पाण्याची टंचाई होत असल्याने नगरसेवकांनी जनजागृती करावी, असे आवाहन खांबित यांनी केले होते.
दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन भाईंदर पूर्व भागात शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या भागात पाणी कमी सोडले जात असल्याने पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे तसेच त्यांना राजकीय फायदा करून देण्यासाठी पाणी वाटपात भेदभाव केला जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागात जास्त पाणी सोडले जाते असा आरोप विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील गटनेत्या नीलम ढवण आदींनी केला बुधवारी होता.
त्यानंतर गुरुवारी भाजपाचे उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृहनेते प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील पाणी समस्येला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचा आरोप केला. शहरात दोन आमदार व खासदार असून देखील शासनकडून कमी पाणी दिले जात आहे. पालिकेत भाजपाची सत्ता असल्याने पाणी कमी दिले जात आहे. मंजूर पाणी कोटा शहराला दिला नाही. जर मंजूर कोट्यातले पाणी दिले नाही तर १२ एप्रिलपासून आयुक्त दालनाबाहेर धरणे धरू असा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.
भाजपच्या पत्रकार परिषदेतील आरोपांवरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत म्हणाले की, एमआयडीसीचे १२५ दशलक्ष लिटर पाणी काँग्रेस आघाडी शासन काळातच मंजूर झालेले होते. परंतु आम्ही पाणी आणले व २४ तास पाणी देण्याचा खोटा प्रचार भाजपाने केला. निवडणुकीत भाजपाचे नरेंद्र मेहताना जनतेने पाणी पाजले आणि शहरात पाणी टंचाई सुरु झाली . महापौरांना एमआयडिसीने दिलेल्या पत्रातच ते २५ दशलक्ष लिटर पाणी केवळ पावसाळ्या पुरते तात्पुरते होते असे स्पष्ट केले होते . यावरून भाजपाने निवडणुकीत मतांसाठी लोकांची फसवणूक केली, असा आरोप सामंत यांनी केला .
विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील म्हणाले की , एमआयडीसीकडून मिळणारे पाणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंजुरीमुळे शहराला मिळत आहे. वास्तविक उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होतो व त्याच्या नियोजनासाठी पाणी कपात या आधी सुद्धा केली गेली आहे . परंतु शहरातील पाणी गळती रोखणे , समान पाणी वाटप करणे , अनधिकृत नळजोडण्या रोखणे, वितरण यंत्रणा सुधारणे ह्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपाने स्वतःची पापे झाकण्यासाठी हे असे कांगावे सुरु केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे .
एका सामाजिक संस्थेचे पदाधिकारी भगवान कौशिक म्हणाले की, महापालिकेने बिल्डरांच्या नवीन बांधकाम प्रकल्पांसह अनधिकृत बांधकामे आणि स्वतःच्या क्लब , इमारती आदी बांधकामांना नव्याने नळजोडण्या दिल्या . या जोडण्या हजारोंच्या संख्येत आहेत . यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून आजची पाणी टंचाई सत्ताधारी भाजपाने निर्माण केली असल्याचा आरोप कौशिक यांनी केला.