ठाणे : डम्पींगच्या मुद्यावरुन दिव्यातील राजकारण शांत होत नाही तोच दिव्यातील अनाधिकृत घरांना लावण्यात येणारा मुळ घरपट्टीच्या तिप्पट असलेला शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचा दावा शिवसेनेने करुन या भागात ढोलाताशे वाजविले आणि जोरदार पोस्टरबाजीदेखील केली. परंतु,प्रत्यक्षात ती रद्द केली नसल्याचा दावा भाजपाने केला आहे. त्यामुळे ती रद्द करावी या मागणीसाठी दिव्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. तर शिवसेनेचा खोटारडपणा थेट महापालिकेनेदेखील उघड केला असून मनसेने मागणी केल्यानंतर पालिकेने ही शास्तीच रद्द झाली नसल्याचे लेखी कळविले आहे. ठाणे महानगर पालिकेचे उपनगर असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या मागील अनेक वर्षांत वाढत असून रेल्वे स्थानकाजवळ सर्वसामान्यांना परवडणारे घर मिळत असल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय नागरिकांनी स्वत:चे हक्काचे घर म्हणून दिवा शहराची निवड केली आहे. दिवा शहरातील जवळपास ४५ हजार अल्प उत्पन्न चाकरमानी कुटुंबांना शास्ती कर भरणे परवडत नव्हते. सर्वसामान्यांना अन्यायकारक ठरणारा शास्ती कर रद्द करण्याकरता पालकमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यानंतर शासनस्तरावर त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिवा शहरातील या कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार अशा प्रकारचे फलक आणि घरोघरी पत्रकबाजीही करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे हे श्रेय खोटारडे कसे आहे, याचा पुरावाच दिव्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे आणला आहे. दिव्यातील काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यात तथ्य आहे का? अशी विचारणा केली. परंतु अशा प्रकारे शास्ती रद्दच करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा दावा पुन्हा फोल ठरला. दुसरीकडे शास्ती करण्यात आली आहे, हे पाहण्यासाठी दिव्यातील काही मनसचे काही पदाधिकारी पालिकेत मंगळवारी कर भरण्यासाठी गेले असता ती घेतली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
शास्तीच्या मुद्यावरुन दिव्यात राजकारण
By admin | Published: January 11, 2017 7:20 AM