ठाणे : ग्रामपंचायतींसाठी २३ जून रोजी मतदान होत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या २०० सदस्यांसाठी मतदान होणार होते. मात्र, १५८ सदस्य व एका सरपंचपदाच्या जागेसाठी उमेदवारी अर्जच आला नाही. एसटी उमेदवारांसाठी या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, उमेदवारच मिळाले नाहीत. तर, अन्य काही ठिकाणी न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यामुळे तेथे मतदान होणार नाही. यामुळे जिल्ह्यातील केवळ सात मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे.मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये शहापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यातील प्रत्येकी एका सदस्यासाठी मतदान आहे. याप्रमाणेच कल्याणच्या एका ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्यासाठी आणि भिवंडीत चार ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण तालुक्यातील खोणी आडवली येथील एका सदस्याच्या निवडीसाठी स्थगिती मिळाली आहे. याप्रमाणेच भिवंडीच्या खारबाव ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठीदेखील स्थगिती मिळाली असून एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.शहापूर तालुक्यामधील गोठेघर ग्रामपंचायतीच्या एका जागेचे व मढहाळ येथील चार जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने पडल्यामुळे तेथील निवडणूक आयोगानेच रद्द केली आहे. येथील आरक्षण गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषदेला पाठवले, जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाºयांकडे आणि तेथून थेट आयोगाकडे गेले. मात्र, या दोन ग्रामपंचायतींच्या पाच जागांचे आरक्षण चुकीचे असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनात आली आणि येथील निवडणूक रद्द करण्यात आली. यामुळे या जागांसाठी मतदान होणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. चुकीचे आरक्षण, न्यायालयीन स्थगिती आणि आरक्षित जागेवर उमेदवार न मिळाल्यामुळे तेथे निवडणूक प्रक्रिया पार पडत नसल्याचे वास्तव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीस अनुसरून निदर्शनास आले आहे.मुरबाडमध्ये सरपंचासह ७४ जागांवर उमेदवारांचा शोधउमेदवारी अर्ज न आलेल्यांमध्ये एका सरपंचपदासह १५८ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. यापैकी मुरबाड तालुक्यातील ७४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. शहापूर तालुक्यातील एका सरपंचपदासह ४५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नाहीत. कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींसह अंबरनाथ, भिवंडी तालुक्यांतील प्रत्येकी १३ सदस्यांच्या निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडणार नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. या विविध समस्यांमुळे जिल्ह्यात केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात १५९ जागांवर उमेदवारच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:05 AM