ठाणे : सुमारे साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या २१ संचालकांपैकी १५ संचालकांसाठी आज, ३० मार्च रोजी मतदान होत आहे. यासाठी तब्बल ४६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांना तीन हजार ६२ मतदार मतदान करणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे ठिकठिकाणी सज्ज केली आहेत.
या बँकेच्या २१ पैकी पाच संचालकांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे आज केवळ १५ संचालकांसाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सभासदांना या बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क आहे. त्यामध्ये तीन हजार ६२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांना सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून एका मतदान केंद्रावर एकावेळी ३० मतदारांच्या मतदानाची तयारी ठिकठिकाणच्या १५ मतदान केंद्रांवर केली आहे.
या मतदान केंद्रांवर प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासह पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी पंतसंस्था, नागरी बँकांतर्फे मच्छिमार संस्था, जंगल कामगार, दुग्ध व्यवसाय संस्थांचा मतदारसंघ, खरेदी विक्रीचा मतदारसंघ, महिला राखीव, एससी व एसटी मतदारसंघ, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त, भटक्या जमाती सदस्यांचा मतदारसंघ, आदींमधील ४६ उमेदवारांना मतदान होणार आहे. यासाठी सहकार पॅनेलसह महाविकास परिवर्तन पॅनेल, आदी निवडणूक लढवत आहेत. तर काही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.