लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महिलांच्या यशाचा मार्ग अवघड असतो. चूलखंडाशी प्रत्येक महिलेचा संबंध रोजच येतो. परंतु चूलखंडापासून जगाच्या वेगवेगळ्या खंडापर्यंत भरारी घेण्याऱ्या महिलांचा गौरव करण्याचे कार्य ‘लोकमत’ने केले आहे, असे कौतुकोद्गार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी काढले.
लोकमत सखी मंच आयोजित सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्यातील सन्मान, अभिमान यांची जाणीव करून देणारा "ती"चा सन्मान सोहळा अर्थात लोकमत `वुमन्स ॲचिव्हर्स अवॉर्ड्स` रविवारी मोठ्या उत्साहात आणि महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत आयलीफ रिट्झ बँकवेट हॉल येथे संपन्न झाला. यावेळी पुरस्कारप्राप्त महिलांचा आत्मविश्वास द्विगुणित करताना गोऱ्हे म्हणाल्या की, लोकमत वुमन ॲचिव्हर्स अवॉर्डमुळे एक गोष्ट घडली की, कोणी तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही म्हणू शकता की, तुम्ही वुमन ॲचिव्हर्स आहात. ‘लोकमत’च्या कार्यक्रमातील महिलांना लक्ष्मी, सरस्वती, दुर्गेचे वरदान आणि आशीर्वाद लाभलेले आहेत, असे सांगत त्यांनी लोकमत व दर्डा कुटुंबाने निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कल्पना चावला, पी. टी. उषा यांसारख्या असंख्य महिलांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. स्त्री ही उत्तम अर्थमंत्री असते. घरातील पुरुष जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा त्या कठीण प्रसंगात त्यांना आव्हान पेलण्याची ताकद त्या घरातील स्त्री देत असते, असेही ते म्हणाले. शेवटी त्यांनी लोकमत परिवाराचे आभार मानले. लोकमत, पुणेच्या कार्यक्रमात यापूर्वी सहभागी होण्याची तर त्यानंतर ठाण्यातील लोकमत वुमन ॲचिव्हर्स अवॉर्डमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री, राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी पुरस्कारप्राप्त महिलांचे कौतुक केले. लोकमतसोबत रायगड जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित केल्याचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या की, यात शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेत रक्ताच्या २००हून अधिक बाटल्या संकलित केल्या. सोहळ्याबद्दल बोलताना तटकरे म्हणाल्या, एक महिला जेव्हा दुसऱ्या महिलेचा सन्मान करते तेव्हा ते प्रगतशील पाऊल उचललेले असते. लोकमतने या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी हास्यजत्रेचा प्रवास सांगितला. यावेळी कानाकोपऱ्यातील ध्येयवेड्या सेवाव्रतींना या पुरस्कारामार्फत मानाचा मुजरा देण्यात आला. सोहळ्यात तब्बल ५३ महिलांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला अभिनेत्री अदिती सारंगधर, अभिनेत्री आणि फॉर्म्युला ४ कार रेसर मनीषा केळकर, जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन, पिल्लाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. निवेदिता श्रेयन्स, ग्रेयॉन कॉस्मेटिक एलएलपीचे डेझी गनेटेड पार्टनर नीरज जैन, आयलीफ बँकवेट्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रतिश आंबेकर, आयलीफ बँकवेट्सचे संचालक अभिषेक कदम, लोकमतचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे व्हेन्यू पार्टनर आयलीफ बँकवेट तर गिफ्ट पार्टनर ग्रेयॉन कॉस्मेटिक एलएलपी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. सुरुवातीला सौपर्णिका डान्स अकॅडमीने स्वागत नृत्य सादर केले आणि श्रीजित मोहन आणि श्रुती मोहन यांनी नृत्याविष्कार सादर केला. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते ५३ महिलांच्या कर्तृत्त्वाची यशोगाथा सांगणारे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले.
-------------------------------
लोकमत वुमन ॲचिव्हर्स अवॉर्ड विजेत्या महिला
डॉ. स्नेहा भोईर, डॉ. सुमन यादव, डॉ. वैशाली बडगे (घोटकर), डॉ. अनिता तरळेकर, जयश्री पांचाळ, प्रिया रतांबे, निशिगंधा पष्टे, निकिता कोठारे, भारती जखर, तृषाली वाघमारे, ॲडव्होकेट नम्रता सावंत, ॲडव्होकेट निहा राऊत, लँड्स्केपिंग प्रोप्रायटर अस्मिता गोखले, शिमोना भन्साळी, प्रतीक्षा साबळे, सौम्या सिंग, निशीता सुवर्णा, डॉ. असीम हरवंश, डॉ. सुनीता पोटे, प्रविणा मोरजकर, श्वेता पाटील, दिव्या अहुजा, शीतल राऊत, कांचन कुलकर्णी, प्रमिला पाटील, सायली खोत, शीतल जोशी, वर्षा काळे, विमल पवार, मेघना पाटील, अरुंधती ब्रह्मकुमारी, ज्योती मेहेर, नीता पाटील, वीणा देशमुख, मंगला परब, मेहरून्नीसा लोगडे, गीता भांडारी, हर्षदा टक्के, पद्मजा राजगुरू, हर्षला तांबोळी, अनुजा राजगुरू घाडगे, आशा झिमुर, ग्लोरिआ डिसुझा, मेघा परब, जया महाजन, मनीषा वाळेकर, दिव्या गायकवाड, प्रेरणा सावंत, रजनी गायकवाड, सुवर्णा जोशी, राधिका फाटक, नम्रता भोसले, अनामिका वसईकर.
-------------------------------
वाचली