कल्याण - पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही.डोंबिवलीतील प्रदूषणाच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांकडून प्रदूषणाविरोधात लढा सुरू आहे. डोंबिवलीत एकदा हिरवा पाऊस पडला होता. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीतून हिरव्या रंगाचा नाला वाहतोय. येथील प्रदूषण नियंत्रणात आलेले नाही, तर ते वाढलेले आहे.प्रदूषणप्रकरणी एमआयडीसीने आपली जबाबदारी झटकत यासाठी कंपन्यांना जबाबदार धरले आहे. एमआयडीसीने यावर अजब तोडगा सुचवत, पावसाचे पाणी सांडपाणी केंद्रात सोडू नका, अशी तंबी कंपन्यांना दिली आहे. मात्र, पावसाला अद्याप सुरुवातच झालेली नसताना, एमआयडीसीने दिलेला सल्ला म्हणजे कातडीबचाव धोरणाचाच भाग असल्याची टीका होत आहे. अशा प्रकारे दोषारोप करून प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघूच शकत नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.डोंबिवलीच्या नांदिवली नाल्यातून शनिवारी हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. त्याचा त्रास रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना झाला. नागरिकांनी याविषयी तक्रार केली आहे. २०१४ मध्ये डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याने प्रदूषणाचा विषय चर्चेत आला होता. त्यानंतर, प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळासह सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने नाल्यातून रसायनमिश्रित हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. ही केवळ एक दिवसाची तक्रार नाही. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कारखान्यांतून सांडपाण्यावर योग्य निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याने वनशक्ती या पर्यावरण संस्थेने दाखल केलेला हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रदूषण रोखण्याचा दावा न्यायप्रविष्ट आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. डोंबिवलीतील रासायनिक व कापड उद्योग प्रक्रियेतून प्रक्रियेपश्चात निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या आहेत. या वाहिन्यांचे चेंबर ओव्हरफ्लो होतात. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाच्या पाहणीत रासायनिक सांडपाणी वाहून नेण्याºया वाहिन्यांचे चेंबर्स ओव्हरफ्लो होत असल्याप्रकरणी एमआयडीसीला जाब विचारला असता एमआयडीसीने याप्रकरणी सर्व कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.नोटीसमध्ये एमआयडीसीने म्हटले आहे की, नाल्यात कापड, धागे, प्लास्टिक अडकून चेंबर्स ओव्हरफ्लो होत आहेत. त्याचबरोबर केवळ रासायनिक सांडपाणी या वाहिन्यांद्वारे न सोडता त्याद्वारे पावसाचे पाणी सोडले जात असल्याने चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी नाल्यात जाऊन मिसळते. पावसाचे सांडपाणी एका स्वतंत्र वाहिनीद्वारे नाल्यात न सोडल्यास कारखाने बंद करण्याची तंबीही देण्यात आली आहे.जबाबदारी झटकून कंपन्यांकडे बोट दाखवत केला बचावडोंबिवली एमआयडीसीतील फेज नंबर-२ मधील रासायनिक सांडपाणी केंद्र हे १.५ दक्षलक्ष लीटर क्षमतेचे आहे. त्यांचे अपग्रेडेशन केल्याप्रकरणी जागतिक पर्यावरणदिनी वसुंधरा पुरस्काराने या केंद्राला सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरवले आहे. तरीदेखील नाल्यात प्रक्रियेविना रासायनिक सांडपाणी सोडले जात असेल, तर अपग्रेडेशन कशाचे केले आणि पुरस्कार कशाच्या आधारे दिला गेला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.वाहिन्या व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती एमआयडीसीने करणे अपेक्षित आहे. मात्र जबाबदारी झटकत कंपन्यांकडे बोट दाखवून मंडळाच्या भरारी पथकाच्या कारवाईतून बचावासाठी एमआयडीसीने नोटीस पाठवल्यात.
डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:45 AM