ठाणे : निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला असून प्रत्येक उमेदवार आपली प्रचारफेरी आपापल्या मतदारसंघातून काढत असताना लाउडस्पीकरवर घोषणाबाजी करीत आहे, प्रचाराची गाणी वाजवत आहे. हे कमी म्हणून की काय, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येऊ नये, याकरिता बेन्जो वाजवला जात आहे. यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे निवडणूक आयोग व पोलिसांनी चक्क कानाडोळा केला असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी ठाण्यातील दक्ष नागरिकांनी केल्या आहेत.
सध्या परीक्षांचे दिवस सुरू असून शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी अभ्यास करीत असताना वरचेवर उमेदवारांच्या वेगवेगळ्या भागातील प्रचारयात्रांनी त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना वाजतगाजत मिरवणुका काढल्या व दणदणाट केला. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा प्रचाराचा जोर वाढला. शनिवारी दुपारी प्रचार संपत असल्यामुळे शेवटच्या दोनचार दिवसांपासून उमेदवारांची मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. उमेदवारांच्या दिवसा व सायंकाळी निघणाºया प्रचाररॅलीतून होणाºया ध्वनिप्रदूषणामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत.
याखेरीज, काही भागात जाहीर सभांचे आयोजन केले असून त्याकरिता घोषणा देत येणारे कार्यकर्ते व सभेपूर्वी लावली जाणारी प्रचारगीते यामुळे आजूबाजूच्या वृद्ध, विद्यार्थी तसेच रुग्णांना त्रास होत आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत राजकीय पक्ष जागरूक तर नाहीच, परंतु पोलीस आणि निवडणूक आयोगही दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. एरव्ही गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, गुढीपाडव्यातील ढोलताशांमुळे होणाºया ध्वनिप्रदूषणाबाबत ओरड करणारे पर्यावरणवादीही या प्रचाररॅलीतून होणाºया ध्वनिप्रदूषणाकडे फारसे लक्ष देत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ध्वनिप्रदूषणाचे नियम सण-उत्सवाबरोबर निवडणुकीच्या प्रचारालाही लागू होतात. परंतु, निवडणूक काळातच हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.ध्वनिमर्यादा ही सगळीकडे सारखीच लागू असते, अगदी निवडणुकीच्या प्रचारालाही. डब्ल्यूएचओनुसार आवाजाचे डेसिबल्सचे मापदंड ठरले आहेत. रहिवासी परिसर, रुग्णालय परिसर, औद्योगिक क्षेत्र आणि शांतता क्षेत्र या ठिकाणचे डेसिबलचे मापदंड ठरलेले आहेत. तो मापदंड कोणत्याही दिवशी बदलत नाही. निवडणूक असो वा नसो, निवडणूक काळात आवाजाच्या मर्यादा बदला, असे होत नाही. आवाज कमीच ठेवला पाहिजे. वर्षातून १५ दिवस १० ते १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर लावण्यास परवानगी आहे. परंतु, ते १५ दिवस हे सण-उत्सवांचे असतात. तेव्हा मंजूर मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल्स वाढवू शकत नाही. निवडणूक काळात व निकाल लागल्यानंतर उमेदवारांकडून जिंकल्यावर गोंधळ घालून वायू आणि ध्वनिप्रदूषण केले जाऊ नये, याची काळजी उमेदवारांनी स्वत:च घ्यावी.
- डॉ. महेश बेडेकर, पर्यावरण अभ्यासक