मुरलीधर भवार, डोंबिवलीडोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून प्रत्यक्ष वाहिन्या टाकण्याच्या कामाला तीन वर्षांचा काळ लागेल, असे प्रतिज्ञापत्र एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केले आहे. तोवर रासायनिक सांडपाण्याचे नेमके काय करायचे याचा तिढा सोडवावा लागेल. एमआयडीसीच्या प्रतिज्ञापत्रामुळे रासायनिक कारखान्यांचे धाबे दणाणले असून ७ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. डोंबिवली आणि अंबरनाथच्या रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता ते थेट नदी आणि खाडीत सोडले जाते. त्यामुळे भूसृष्टी, जलसृष्टीवर होणारे परिणाम आणि वाहून जाणाऱ्या सांडपाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांच्या आरोग्याला उद््भवलेला धोका अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरु आहे. लवादाने मागील सुनावणीवेळी एमआयडीसीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने ते १ आॅक्टोबरला सादर केले आहे. वनशक्तीची या याचिकेवर गेली तीन वर्षे सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान लवादाने केंद्रीय प्रदूषण मंडळ व राज्य प्रदूषण मंडळाची कानउघाडणी केली. त्यानंतरच प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ रासायनिक कारखान्यांना रासायनिक सांडपाणी बंद करण्याची नोटीस बजावल्याने त्या दिवसापासून कारखाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत असल्याने लवादाने त्याची गंभीर दखल घेतली. कारखानदारांना पायाभूत सोयी सुविधा पुरविणे तसेच सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी टाकण्याची जबाबदारी, तिची देखभाल-दुरुस्ती ही एमआयडीसीची जबाबदारी आहे. ती एमआयडीसी पार पाडत नसल्याचा मुद्दा समोर आला आणि या सोयी सुविधा कधी पुरविणार, त्याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण एमआयडीसीला नोटीस बजावली आणि लवादाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.
प्रदूषण तीन वर्षांनी दूर होणार
By admin | Published: October 04, 2016 2:23 AM