ठाणे : ठाण्यातल्या विविध लोकवस्तीमधील युवा एकलव्य विद्यार्थी "आमची वस्ती! आपले शहर!" या संकल्पनेभोवती त्यांना जाणवणारे विविध प्रश्न, त्यांनी स्वतःच बसवलेल्या विविध नाटिकांमधून साकारणार आहेत. सदर नाटिका समता विचार प्रसारक संस्था व बालनाट्य संस्था आयोजित वंचितांचा रंगमंचावरील युवा नाट्य जल्लोष या उपक्रमा अंतर्गत सादर होतील. ठाणे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंदनवाडी तीन टाकी जवळील पांचपाखाडी येथील काॅम्रेड गोदुताई परूळेकर उद्यानातील खुल्या रंगमंचावर हा नाट्य जल्लोष रविवारी, ३ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुरू होणार असून सर्व संवेदनशील रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ, संयोजक हर्षदा बोरकर व सह संयोजक निलेश दंत यांनी दिली.
यंदा या लोक युवा महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. गेली सुमारे महिनाभर, विविध वस्त्यांधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिद्दीने पुढे वाटचाल करणा-या युवा वर्गाने कसून मेहनत घेत या नाटिकांचे विषय आधी नक्की केले, मग त्यांच्या संहिता विकसित केल्या व मग मिळेल त्या जागेत - बागेत, मोकळ्या मैदानात वा शाळेच्या वर्गात - सराव सुरू केला. नुकतीच या सर्व गटांच्या नाटिकांची रंगीत तालीम पार पडली. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व या उपक्रमाचे प्रणेते रत्नाकर मतकरी, महेंद्र भंडारे, जगदीश खैरालिया, डाॅ. संजय मंगला गोपाळ, हर्षदा बोरकर आदींनी या कलाकारांना अनेक सूचना केल्या.
मानपाडा गटाचे किन्नरांच्या समस्येवर भाष्य
आपल्या वस्तीत अत्यंत हलाखीचे व तिरस्करणीय आयुष्य जगणा-या तृतीयपंथीय किन्नर समाजाचे हलाखीचे जगणे मानपाड्याच्या गटाने उभे केले आहे. साधी स्वच्छतागृहे नसणे, शाळेत हिडीस फिडीसचे जगणे जगावे लागणे, कोणत्याही नोक-यांसाठी त्यांना पात्र न मानणे, असे अनेक मुद्दे मुलांनी या नाटिकते ऊभे केले आहेत. यासाठी त्यांनी भरपूर अभ्यास, ठाण्याच्या मा. महापौर मॅडम आदी मान्यवरांच्या गाठी भेटी असे परिश्रम घेतल्याचे मानपाडा गटाचे संयोजक दीपक वाडेकरने सांगितले. एक दिर्घांक बसविण्या इतपत तयारी या गटाने केली, हे विशेष, अशा शब्दात रत्नाकर मतकरी यांनी या गटाचे कौतूक केले.
वस्तीत जोपासला जाणारा सांप्रदायिक सलोखा अलिकडच्या काळात राजकारणी वा धर्माचा दुरूपयोग करणा-या संघटना कशा संकटात टाकत आहेत, हे मुकनाट्याद्वारे कळवा गटाने अनोख्या रितीने व प्रभावीपणे सादर केले. व्यक्तिगत धर्मापेक्षा भारत धर्म मोठा, हे त्यांनी आपल्या नाटिकेतून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.
उथळसर - राबोडी गटाचं 'एक पाऊल स्वच्छतेकडे'!
एकीकडे सरकारचा स्वच्छता अभियानाचा भपकेदार बोलबाला तर दुसरीकडे स्वच्छतेबाबत नागरिकांमधला बेजबाबदारपणा, अशा कैचीत भर पडते ती गरीबांच्या वस्त्यांमधे स्वच्छते बाबत महापालिकेकडून केला जाणा-या दुजा भावाची! हे सारं अभिव्यक्त केलंय उथळसर राबोडी गटाने. सफाईची जबाबदारी सफाई कर्सामचा-यांवर ढकलण्याच्या पांढरपेशा समाजाच्या प्रवृत्ती दाखवत या गटाने सफाई कामगारांच्या समस्यांकडेही लक्ष वेधले आहे.
सावरकर नगरच्या गटाने शहरातल्या तलावांचं आक्रसत जाणं व त्यासोबतच पारंपारिक आगरी - कोळी समाजाला विकासाच्या नावाखाली बेदखल करत जाणं, हे प्रभावीपणे सादर केलं. यासाठी त्यांनी 'तलाव' संस्थेचे मयुरेश भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तलावांना व कोळी वाड्याला भेट दिली, असं त्या गटाच्या संयोजक अनुजा लोहारने सांगितलं. किसन नगर गटाने त्यांच्या नाटिकेतून मराठी कवितांमधे व्यक्त होणा-या वस्त्या सादर केल्या आहेत. विश्वनाथ चांदोरकर या गटाचे संयोजन करीत आहे.
नाट्य चित्र क्षेत्रातील अनेक मान्यवर युवा नाट्य जल्लोषला उपस्थित रहाणार
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजू माने, जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, साहित्यिक वासंती वर्तक, लघुपटकार प्रा. संतोष पाठारे व प्रदीप इंदुलकर, दिग्दर्शक संतोष वेरूळकर, सामाजिक कार्यकर्ते नंदिनी व अविनाश बर्वे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती समता विचार प्रसारक संस्थेच्या लतिका सु. मो. यांनी दिली. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते वंदना शिंदे, मंगल व सुरेंद्र दिघे, मतीन शेख, जाॅन डिसा, अनिल शाळीग्राम, डाॅ. गिरीश साळगावकर, अॅड. प्रशांत पंचाक्षरी, मयुरेश भडसावळे, उन्मेष बागवे आदी मान्यवरांचा या उपक्रमास पाठिबा व सहकार्य मिळाले असून ते या वेळी उपस्थित राहणार आहेत. सुनील दिवेकर, अजय भोसले, आतेश शिंदे, दुर्गा माळी, सीमा श्रीवास्तव आदी कार्यकर्ते हा महोत्सव यशस्वी व्हावा याकरता मेहनत घेत आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव राहूल सोनार यांनी दिली.