डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन शनिवारी तात्पुरत्या स्वरूपात बुजविले हाेते. मात्र, रविवारी रक्षाबंधन असल्याने रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे दुपारी ३ ते ४ या कालावधीत या पुलावरील व आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली हाेती. उड्डाणपुलाजवळील जोशी हायस्कूललगतचा रस्ता, नेहरू रोड, छेडा रोड हे रस्ते जॅम झाले होते.
कोपर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलावरून डोंबिवली शहरातील पूर्व-पश्चिम वाहतूक सुरू आहे. रेल्वेच्या हद्दीत उतरणाऱ्या या पुलावर खड्डे पडले आहेत. तसेच मनपाच्या हद्दीत पूर्वेतील बाजूला उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाही खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे होणारी वाहतूककोंडी पाहता रेल्वे आणि केडीएमसीने पुढाकार घेणे आवश्यक असताना शनिवारी वाहतूक पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले. शनिवारी आणि रविवारी कल्याण-शीळ मार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली हाेती. रविवारी रक्षाबंधन असल्याने माेठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आली. त्यामुळे ठाकुर्ली उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा प्रवास करणाऱ्या वाहनांना चांगलीच कसरत करावी लागली. काही दुचाकीचालकांनी तर बाजूला आपली गाडी उभी करून श्री गणेश मंदिराच्या बाजूला असलेला आणि पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचा आधार घेतला हाेता. काही वाहनचालकांत वादाचे प्रकारही घडले. या कोंडीमुळे फडके मार्गावरून येणाऱ्यांनीही आपली वाहने आजूबाजूच्या गल्लीबोळांच्या दिशेने वळवून इच्छितस्थळी जाणे पसंत केले. नेहरू रोड, छेडा रोड या मार्गावर कधीही कोंडी होत नाही. पण, रविवारी दुपारी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही आपल्या गाड्या बाहेर काढताना त्रासाला सामोरे जावे लागले. कोपर उड्डाणपूल गणेश चतुर्थीला सुरू होईल, असा दावा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकताच केला आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाची स्थिती पाहता लवकर हा पूल चालू व्हावा, अशी मागणी डोंबिवलीकर करीत आहेत.
------------------------------------------------------
नेवाळी नाक्यावरही कोंडी
कल्याण-मलंगगड रस्त्यावरील नेवाळीनाका परिसरातही प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. रक्षाबंधनासाठी बाहेर पडलेले एक ते दीड तास अडकून पडले होते. याचबराेबर कल्याण-शीळ महामार्गावरही तासनतास वाहनांची रांग लागली हाेती.
---------------------------------
फोटो आहे