ठाणे : ठाणेकरांच्या नेहमीच पसंतीच्या यादीत अव्वल स्थानावर असणारा वडापाव आता महागला असून चक्क २० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वडापावला महागाईची फोडणी मिळाली असल्याने कुठे एक तर कुठे दोन रुपयांनी त्यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
१) म्हणून महागला वडा पाव...
गेल्या ऑक्टोबरपासून तेलाच्या दरात होणारी सततची वाढ, गॅसच्या दराचा उच्चांक, बेसन आणि बटाटे महागल्यामुळे वडापावच्या दरात विक्रेत्यांना वाढ करावी लागली आहे. त्यामुळे हातगाडीवर १५ रुपये तर दुकानांत १८ ते २० रुपयांना वडापाव मिळत आहे.
२) वडापावशिवाय दिवस जाणे कठीण
वडापाव हा माझा ऑल टाइम फेव्हरेट पदार्थ आहे. कधी वडापावच्या गाडीच्या बाजूने गेलो आणि वडापाव खाल्ला नाही असे कधी होत नाही. शाळेत डबा नसेल तेव्हा मधल्या सुटीत धावत पळत जाऊन वडापाव घेऊन पोटाची भूक भागवायचो. वडापावच्या जुन्या आठवणीदेखील आहेत.
- सागर साळवी
बऱ्याच वेळा कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागते. प्रत्येक वेळी वेळेत जेवण मिळतेच असे नाही. पण गरमागरम मिळणारा वडापाव सहज उपलब्ध होतो. भूक तर भागतेच पण खिशालादेखील परवडतो. काही ठिकाणचे प्रसिद्ध वडापाव जाऊन खाण्यात तर खास मजा येते.
- विश्वास उदगीरकर
३) कोरोनाचा फटका वडपावला बसलेला नाही. पण तेल, गॅसचे वाढते दर यांमुळे मात्र वडापाव महाग झाला. वडापाव महाग जरी झाला असला तरी इतर पदार्थांच्या तुलनेत तितका महाग नाही. गरिबांचे अन्न म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे महाग झाला तरी खिशाला परवडणारा आहे.
- प्रशांत ठोसर, स्नॅक्स कॉर्नरचे मालक
आमच्याकडे १४ रुपयांना मिळणारा वडापाव आता १५ रुपये झाला आहे. आम्ही एक रुपया यात वाढविला आहे. तेल आणि गॅसचे वाढते दर यामुळे किंमत वाढवावी लागली. समोसा आणि वडापाव समोर असेल तर वडापावलाच ठाणेकर पसंती देतात.
- प्रदीप राणे, स्नॅक्स कॉर्नरचे व्यवस्थापक