लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी ग्रामीण भागातील रस्त्यांची सध्या अक्षरशः दुरवस्था झाली असून भिवंडी-वाडा महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. भिवंडी-वाडा रस्ता पूर्ण खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होऊन नागरिकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. मात्र, याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
या महामार्गावरील बोरपाडापासून ते अंबाडी व पुढे कुडूसपर्यंत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. यापूर्वी या महामार्गाची देखभाल एका खासगी टोल कंपनीकडे होती. मात्र, कंपनीने दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. नंतर शासनाने या महामार्गावरील कवाड येथील टोल नाका बंद केला आहे. त्यामुळे आता या रस्त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले असून नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.