भिवंडी : पडघा येथील मुख्य बाजारपेठ रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पडघा ही आजूबाजूच्या अनेक गावांची मुख्य बाजारपेठ व केंद्रबिंदू असल्याने अनेक नागरिकांसह वाहनांची मोठी वर्दळ दिवसरात्र या रस्त्यावरून सुरू असते. त्यातच सध्या पावसामुळे रस्त्याची चाळण होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्राम पंचायत कमिटी, प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. हा रस्ता सन २०१५-१६ च्या दरम्यान बनवण्यात आला होता; मात्र अवघ्या पाच-सहा वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्ता बनविण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्यासाठी लाखोंचा निधी मंजूर झाला असून, उल्हासनगर येथील कंपनी हे काम करत असून, अत्यंत संथ गतीने सुरू आहे.