भिवंडी : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन भिवंडी तालुक्यातून जात असून, वळपाडा ते काल्हेरदरम्यान मुंबई महानगरपालिकेने या पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रस्ता बनवला आहे. या रस्त्यावर मागील दोन वर्षांत ताडाळी ते काल्हेरदरम्यानच्या रस्त्यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र एका वर्षातच या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
या रस्ता दुरुस्ती व बनविण्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी भिवंडी येथील नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे.
या रस्त्याचा वापर मुंबई महानगरपालिका पाइपलाइन दुरुस्तीसाठी करते. या पाइपलाइनशेजारी कशेळी, काल्हेर, पूर्णा, वळ, गुंदवली, कामतघर, ताडाळी या गावांतील स्थानिक ग्रामस्थसुद्धा या रस्त्याचा वापर करतात. सध्या ठाणे-भिवंडी रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला असून, या मार्गावर सदैव वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना खड्डेमय झालेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागत असून, या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ ठेकेदाराकडून करून घेणे गरजेचे आहे. मात्र मुंबई महानगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.