भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील आय.जी.एम. उपजिल्हा रुग्णालयाशेजारी असलेल्या २० दशलक्ष पाणी साठवण क्षमता असलेल्या जलकुंभाची दुरवस्था झाली असून, भविष्यात कधीही अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची भीती नगरसेवक अरुण राऊत यांनी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
या रुग्णालयाशेजारी पालिकेने ४० वर्षांपूर्वी २० दशलक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ बांधला. यातून भिवंडी पूर्वेत पाणीपुरवठा होतो. जलकुंभाची निगा व दुरुस्ती न केल्याने दुरवस्था झाली आहे. स्लॅब व खांबांना चिरा पडलेल्या असून काही ठिकाणी प्लास्टरही निखळून पडले आहे. प्लास्टर निखळून पडण्याच्या घटनांमुळे काहींना किरकोळ दुखपतीही झाल्या आहेत. तसेच जिनाही तुटलेला असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती राऊत यांनी पाहणी केल्यावर व्यक्त केली आहे. जलकुंभाची कित्येक वर्षे स्वच्छता न केल्यामुळे टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व माती साचलेली असून यातून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जलकुंभाच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. दुरुस्ती न केल्याने जलकुंभ धोकादायक स्थितीत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणीही राऊत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.