भिवंडी: तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या पूर्णा ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडच्या उग्रदर्पामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे या डंपिंगकडे पूर्णा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून कोणतीही औषध फवारणी या ठिकाणी होत नसते.त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.या डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हे डम्पिंग ग्राउंड पूर्णा ग्रामपंचायतीचे असून गुंदवली गावच्या मुख्य रस्त्यावरच हे डम्पिंग ग्राउंड असल्याने गुंदवलीसह मानकोली , दापोडा या गावांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात या डम्पिंग ग्राउंड चा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे गुंदवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुमित म्हात्रे यांनी या डम्पिंगसंदर्भात अनेक तक्रारी पूर्णा ग्रामपंचायतीसह पंचायत समितीइ व ठाणे जिल्हा परिषदेकडे अनेक वेळा केली आहे . मात्र त्याकडे शासकीय पूर्णा ग्रामपंचायतीसह शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे.मंगळवारी गुंदवली ग्राम पंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी या डंपिंग ग्राऊंडची पाहणी करत या डंपिंग ग्राऊंडच्या त्रासातून ग्रामस्थांची सुटका करण्याची मागणी पूर्णा ग्रामपंचायतीसह शासकीय यंत्रणेकडे केली आहे.
पूर्णा ग्राम पंचायतीच्या अंतर्गत राजकीय वादामुळे या डंपिंगग्राऊंडच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास गुंदवली गावासह आजूबाजूच्या नागरिकांना होत असून सध्या गणेशोत्सव सुरु झाला असून गणेशोत्सवात नागरिकांना या अशा दुर्गंधीतुन गणपतींच्या मूर्ती घेऊन जाव्या लागणार आहे हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया गुंदवली ग्राम पंचायतीचे उपसरपंच सुमित म्हात्रे यांनी दिली आहे. डम्पिंगच्या या समस्येकडे मागील आठ वर्षांपासून पाठपुरावा करत असूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आता या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच मनेश म्हात्रे यांनी दिली आहे.