ठाणे : केंद्र शासनाने पीओपी गणेशमूर्ती यांची निर्मिती आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या बंदीच्या विरोधात गणेशोत्सव मंडळे कोर्टात जाणार असल्याचे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले. वर्षभर होणारे प्रदूषण आणि गणेशोत्सवाच्या चार दिवसांत होणारे प्रदूषण यांची टक्केवारी केंद्र शासनाने जाहीर करण्याची मागणी समितीने केली आहे.पीओपीबंदीबाबत मंडळांची मते आणि भूमिका जाणून घेण्यासाठी रविवारी समितीने किसननगर येथे बैठक आयोजिली होती. केंद्र शासनाने पीओपी गणेशमूर्तींवर घातलेली सरसकट बंदी ही अमान्य असल्याचे या बैठकीत मंडळांनी सांगितले. केवळ पीओपी गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असेल, तर त्यांनी बंदीऐवजी त्यावर उपाययोजना काढणे गरजेचे होते. हा निर्णय घेताना गणेशोत्सव मंडळे आणि सुप्रसिद्ध मूर्तिकारांची मतेही विचारात घेणे गरजेचे होते, यावर मंडळांचे एकमत झाले. ठाणे जिल्ह्यात जवळपास १,२०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांची मते आणि भूमिका या बैठकीत जाणून घेण्यात आली. बंदी फक्त मूर्तींवर का?पीओपीने प्रदूषण होत नाही, कारण तीही माती आहे. रंगामुळे थोडे प्रदूषण होत असल्याचे मत काहींनी मांडले. नेत्यांच्या कार्यालयात पीओपीचा वापर सर्रासपणे होतो, मग बंदी फक्त मूर्तींवर का, असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत म्हणाले.
पीओपी मूर्तीवरील बंदीविरोधात जाणार न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:38 AM