- अजित मांडकेठाणे : प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हा आता महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. परंतु, असे असले तरी लोकसंख्येच्या मानाने जिल्ह्यात अवघी १३२ आधार केंद्रे आहेत. यामुळे एखाद्याला आधार कार्डात काही किरकोळ बदल करायचे असतील तरी त्यासाठी तब्बल तीन रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांनी आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.आजघडीला ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या जवळजवळ एक कोटीच्या आसपास आहे. परंतु, प्रत्येक ठिकाणी आधार केंद्रांची संख्या ही अपुरी आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आदींसह ग्रामीण भागातही आधार केंद्रांची संख्या अपुरी आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी ठाणे शहरातील विविध भागांतून नागरिक आधार अपडेटसाठी किंवा काही किरकोळ बदल करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आतील भागात त्यांना बसण्यासाठी आसने ठेवलेली आहेत. परंतु, असे असले तरी बाहेरील बाजूस दिवसभर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातही चौकशीसाठी किंवा आधार कार्ड प्रिंटसाठी एक खिडकी ठेवली आहे. त्या ठिकाणीदेखील तोबा गर्दी असल्याचे चित्र दिसते. तर जिल्हा परिषदेच्या आवारात दोन ठिकाणी आधार केंद्रे आहेत. त्या ठिकाणीदेखील सकाळपासून सांयकाळी ५ वाजेपर्यंत गर्दी असते. महापालिका मुख्यालयातील आधार केंद्रांवरदेखील रोजच्या रोज गर्दी दिसत आहे. एका आधार कार्डमध्ये काही किरकोळ बदल करायचे असतील किंवा मोबाइल क्रमांक बदल करायचा असेल तर त्यासाठीदेखील आधी अर्ज भरावा लागतो. त्यानंतर रांगेत उभे राहून आपले काम करून घ्यावे लागत आहे. यासाठीदेखील दोन ते तीन तासांचा कालावधी जात आहे. त्यातही एका व्यक्तीसाठी साधारणपणे १० ते १५ मिनिटांचा कालावधी जात असतो. त्यामुळे रांगा वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही वेळेस सर्वर डाऊन होण्यामुळेदेखील या प्रक्रियेला विलंब होताे. कोरोनामुळे जवळजवळ १० महिने आधार केंद्रेही बंद होती. त्यानंतर आता ती सुरू झाल्यानेदेखील नागरिकांची गर्दी विविध केंद्रांवर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ एक कोटी लोकसंख्येसाठी १३२ आधार केंद्रे ही अपुरी असल्याने त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. का करावे लागते आधार नूतनीकरण?प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हाच मुख्य पुरावा म्हणून लागत आहे. रेशनिंग कार्ड असो किंवा बँक खाते सर्वच ठिकाणी आधार महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आधारमध्ये काही बदल असल्यास, मोबाइल क्रमांक बदलल्यास, नावात बदल असल्यास तसेच वयाच्या ५व्या, १०व्या आणि १५व्या वर्षांनंतर आधार नूतनीकरण करावे लागते.थम्ब इप्रेशन दिले तरी दोन ते तीन वेळा परत परत द्यावे लागते. तसेच काही वेळेस इंटरनेट स्लो असते, व्यवस्थित अपडेट होत नाही, त्यामुळे हा घोळ आधी कमी करावा. त्यामुळेदेखील आम्हाला येथे रेंगाळत राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आधारसाठी आधी नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला २ ते ३ दिवसांनी बोलावले जाते. - महादेव मोरे, ठाणे, विविध कारणांसाठी आधार अपडेट करावे लागत आहे. मला माझा मोबाइल नंबर अपडेट करायचा होता. त्यासाठीदेखील अर्ज भरा, त्यानंतर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही इंटरनेटमध्ये बिघाड आणि सर्वर डाऊन होत असल्याने यात आधी सुधारणा करावी. - सायली तांबे, ठाणे
लोकसंख्या आहे एक कोटी, मात्र आधार केंद्रे अवघी 132
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:04 AM