डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनी कोमल प्रल्हाद यादव हिने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण प्राप्त करत महापालिकेच्या शाळेतूनही दर्जेदार शिक्षण दिले जाते व त्या शिक्षणाच्या जोरावर घवघवीत यश संपादन करता येते, हे सिद्ध केले आहे.
गेल्या वर्षी तिची मोठी बहीण प्रिया यादव हिने पालिकेच्या शाळेतून ९१.६० टक्के गुण मिळवून पहिला क्र मांक मिळवला होता. त्यांच्या या यशामुळे पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. कोमल आजदेपाडा येथे राहते. कोमल हिने माध्यमिक शालान्त परीक्षेत मराठीत ८४, हिंदीत ९०, इंग्लिशमध्ये ८७, गणितामध्ये ९८, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात ९४, तर समाजशास्त्र विषयात ९४ गुण मिळवले आहेत. कोमल हिला एकूण ५०० पैकी ४६० गुण मिळाले आहेत. कोमलचे वडील प्रल्हाद हे पानाची टपरी चालवतात. आई शांती गृहिणी आहे. शिक्षक आणि पालकांमुळे यश मिळाल्याचे कोमलने सांगितले.अभ्यासक्रम बदलला असल्याने एवढे यश मिळेल, असे वाटले नव्हते. पुस्तकेही बाजारात उशिराने आली. त्यामुळे एवढे यश मिळेल, असे वाटले नव्हते. शाळा सुरू झाल्यापासून दररोज तीन तास अभ्यास करत होते. त्यानंतर परीक्षा जवळ आल्यावर दररोज पाच तास अभ्यास केला. मला एमएस होऊन सर्जन बनण्याची इच्छा आहे.- कोमल प्रल्हाद यादव, यशस्वी विद्यार्थिनी