मीरारोड- ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या २७ आदिवासी पाड्यांमधील समस्यांबाबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून आयोजित बैठकमध्ये स्मशानभूमी, बंधारे, सोलर दिवे आदी विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले.
आदिवासी पाड्यांमध्ये पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करून त्यामध्ये अग्निसंस्कारसाठी लोखंडी जाळी व पत्र्याची शेड बसविण्याच्या कामाला वनखात्याने ना हरकत दर्शविली. ज्या ज्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची कमतरता असेल त्या त्या ठिकाणी बोअरवेल खोदून हॅन्डपंप लावण्याच्या कामालाही ना हरकत दर्शविली. ज्या आदिवासी पाड्यांमध्ये शौचालयांची गरज असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटला परवानगी देत असताना त्याची स्वच्छता, निगा व देखभाल स्थानिकांनी करण्याच्या अटीवर मान्यता देण्याचे ठरले.
येऊर येथील आरक्षित असलेल्या भुखंडावर पर्यटन स्थळाचे काम लवकरात लवकर मंजूरी देऊन चालू होणार असून हुमायून धबधब्याजवळील तीन बंधारे बांधण्याच्या कामाला तसेच पाटोणा पाड्याजवळील व चेना नदीवरील बंधाऱ्याच्या कामाला लवकरात लवकर मंजूरी देण्याचे आदेश मंत्री गावीत यांनी दिले. आदिवासी पाड्यांमध्ये ओढे असून पावसाळ्यामध्ये तुडुंब वाहत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ओढे ओलांडता येत नाही. त्यामुळे नाले, ओढे असतील त्यावर साकव बांधण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.
आदिवासी पाड्यांसाठी सरनाईक यांच्या प्रयत्नाने नवीन पद्धतीचे सोलर दिवे लावण्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली असून आदिवासी पाड्यांपर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत करण्याच्या सुचना मंत्री गावित यांनी केल्या. काशीमीराच्या मुन्शी कंपाऊंड येथे आदिवासी विद्यार्थी वसतिगृह बांधण्याचे काम पुर्णत्वास आले असून त्याचे लोकार्पण ६ डिसेंम्बर रोजी मंत्री गावित यांच्या हस्ते करण्याचे निश्चित करण्यात आले. तुंगारेश्वर डोंगरावरील सदानंदबाबा यांच्या आश्रमापर्यंत जाणाऱ्या रस्त्याबद्दल चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले असे आ. सरनाईक म्हणाले.
बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव जी. मल्लीकार्जुन, उपसचिव भानुदास पिंगळे, सहाय्यक वन अधिकारी उदय ढगे, आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता सिध्देश सावर्डेकर आदी उपस्थित होते.