ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, प्रत्येकाने दिला स्वबळावर लढण्याचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:33 PM2021-02-15T23:33:28+5:302021-02-15T23:34:14+5:30
Thane : राज्यात सध्या महाविकास आघाडी सत्तारुढ आहे, परंतु, ठाण्यात मागील महिन्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आगपाखड केली जात आहे.
- अजित मांडके
ठाणे : ठाण्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडी दिसत असली तरी ठाण्यात मात्र महापालिकेवर पुन्हा एकहाती भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस लढती पाहावयास मिळणार आहेत.
राज्यात सध्या महाविकास आघाडी सत्तारुढ आहे, परंतु, ठाण्यात मागील महिन्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आगपाखड केली जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणीदेखील केली. परंतु, आता येत्या काळातही महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचेच दिसत आहे. काँग्रेसने दोन महिन्यापूर्वीच आगामी ठाणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या वरिष्ठांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना थेट कामाला लागा, आपल्याला निवडणूक स्वबळावर लढायची आहे, असे आदेश काढले आहेत, त्यानुसार शिवसेनेचे तळागाळातले कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारीदेखील कामाला लागले आहेत. यामागचा शिवसेनेचा हेतू स्वबळावर लढल्यास जागा वाटपावरून होणारा घोळ टाळला जाणार आहे, तसेच नगरसेवक फुटीला देखील यामुळे लगाम बसणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे, त्या ठिकाणचे नगरसेवक फोडण्याचा डावही शिवसेनेचा असून त्यामुळे जागा वाढणार असल्याचे त्यांचे मत आहे. त्यानुसार आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ७५ ते ८० जागा ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचनादेखील आखली आहे.
शिवसेनेने भाजप विरुद्ध शून्य मोहीम उघडली असून त्याचाच एक भाग म्हणूनही स्वबळाचा नारा दिला गेला आहे. या मोहिमेत राष्ट्रवादीदेखील सामील असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी भाजपची पकड असणार आहे, त्या ठिकाणी सामंजस्य करून शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेदेखील आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असून त्यानुसार अधिक उमेदवारांना संधी देताना, फोडाफोडीच्या राजकारणाला यामुळे अंकुश बसेल असा दावा केला आहे. परंतु राष्ट्रवादीचा वरचष्मा हा राबोडी, लोकमान्यनगर या पट्ट्यात आहे. तर कळवा आणि मुंब्य्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला वाढावे लागणार आहे. परंतु, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य असेल त्या ठिकाणी कमजोर उमेदवार दिला जाणार आहे. तर ज्या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्याठिकाणी राष्ट्रवादी कमजोर उमेदवार देणार आहे. त्यानुसार हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत.
एकूणच राजकीय धुमश्चक्रीत काँग्रेस किती तग धरणार हे पाहणे महत्वाचे आहे, यापूर्वी काँग्रेसच्या मुंब्य्रातून अधिक जागा निवडून येत होत्या. परंतु, मागील निवडणुकीत काँग्रेसचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेसने सध्या मुंब्य्राकडेच अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
मनसेच्या कामगिरीबाबत साशंकता
विधानसभा निवडणुकीत जरी मनसेला बऱ्यापैकी मते मिळाली असली तरी महापालिका निवडणुकीत पक्षाला तो टक्का किती टिकविता येईल याबाबत साशंकता आहे. त्यातही आगामी काळात मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. युती झाली तरच ठाण्यात मनसेला पाय रोवण्यास मदत होणार आहे. परंतु तिकडे दिव्यात पक्ष या निवडणुकीत काहीतरी चमत्कार दाखवण्याची शक्यता मात्र आहे.
भाजपला पक्षफुटीची भीती
येत्या काळात भाजपचे १० ते १२ नगरसेवक फोडू असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे असे जर झाले तर भाजपचा आकडा २३ वरून निश्चितच खाली येण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपकडे आजही शिवसेनेला टक्कर देऊ शकेल असा आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे भाजपला शिवसेनेचा दावा खोटा ठरवायचा असेल तर या फुटीर नगरसेवकांना शोधून त्यांचा आतापासून बंदोबस्त करावा लागणार आहे. अन्यथा, भाजपची वाट बिकट होणार आहे.