- सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. यामुळे तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन या तानसा नदी काठावरील ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३३ गावांना सावधानतेचा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. पावसाच्या या कालावधीत धरणाखालील नदी पात्रात न जाण्याचे सूचित करण्यात आले आहे.
सध्या या तानसा धरणाची पातळी १२५.५५ मि टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मिटर्स टीएचडी इतकी निश्चित केलेली आहे. या तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. याकडे लक्ष केंद्रीत करून तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नदी पात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा या तानसा नदी काठावरील गावांना दिला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १८ गावे व पालघर जिल्ह्यातील १५ गांवांना सावधानतेचा इशारा आहे. याविषयी ठाणे जिल्हा प्रशासनास विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे.
या तानसा धरणाखालील व तानसा नदी लगतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना, रहिवाश्यांना तानसा धरण भरुन वाहण्याची कल्पना देऊन सावध राहण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा, तहसिल कार्यालये, पोलिस यंत्रणा व परिसरातील अधिकार्यांना आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी सूचित करण्यात आले आहे. या गावांपैकी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेलवहाळ, डिंबा, खैरे या नऊ गावांचा समावेश आहे. तर भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळुंगे, गणेशपुरी आदी गांवे तानसा नदी काठावर आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निभावली, मेट, गोराडे ही गावे आहेत. वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरली, अदने, पारोळा, अंबोडे, बँकांचे, साईवान, काशीत-कोरगांव, कोपरगांव, हेडावडे आणि चिमणे आदी गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.