डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील पलावा येथे नवीन उड्डाणपुलासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नसल्याने या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
उड्डाणपुलासंदर्भात शुक्रवारी पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी केडीएमसीचे प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड आणि राज्य रस्ते विकास मंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी अनिरु द्ध बोर्डे उपस्थित होते. त्यावेळी रेल्वे पुलास मंजुरी देत नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे त्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी पलावा येथे नव्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरु वात झाली आहे. या रस्त्यावरील वाढलेल्या बांधकामांमुळे कोंडीत भर पडत असून, त्यावर केडीएमसी कारवाई करत नसल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
त्यावर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना पाटील यांनी केडीएसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर, रस्ता रुंदीकरणात जागा बाधित होणाºया भूमिपुत्रांना तातडीने मोबदला मिळावा, यासाठी केडीएमसी आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शीळफाटा ते काटई रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. रस्त्याची डागडुजी होईपर्यंत टोल आकारू नये, असे पाटील यांनी अधिकाºयांना सांगितले. वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका व्हावी आणि प्रवास जलदगतीने व्हावा, यासाठी त्यांनी कामाला गती देण्याची गरज आहे. पुलाला रेल्वेची परवानगी मिळाली नसल्याने पेच वाढला आहे. कामाची दिरंगाई अपघातांना निमंत्रण देत आहे. याच रस्त्यावर राज्यस्तरीय खेळाडू जान्हवी मोरे हिला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे किती जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पाटील म्हणाले. या पार्श्वभूमीवर ते रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.पलावा येथील जुन्या उड्डाणपुलाचे काम रेल्वेच करणार होती. मात्र, रेल्वेने पत्र पाठवून हे काम एमएसआरडीसीलाच करण्याची विनंती केली आहे. या पुलाचा खर्च रेल्वे एमएसआरडीसीला देणार आहे. मात्र, रेल्वेची परवानगी नसल्याने पुलाचे काम वर्षभरात कसे होणार? असा प्रश्न सध्या वाहनचालकांना पडला आहे. रेल्वेची परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने आमदार राजू पाटील हे लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.