सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा पदभार देण्याची वेळ आयुक्तवर आली. प्रभारी अधिकाऱ्यांचा महापालिकेत बोलबाला होऊन पालिका कारभारात सावळागोंधळ उडाला आहे. यातूनच मंगळवारी प्रभारी वाहन व्यवस्थापकाला लाच घेतांना अटक झाली.
उल्हासनगर महापालिकेत शासन प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येण्यास धजावत नसल्याने, महापालिकेतील विविध विभागातील वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार हा लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्यावर देण्याची वेळ आयुक्तावर आली. क्षमतेवर पेक्षा मोठया पदाची जबाबदारी लिपिक दर्जाच्या कर्मचार्यांच्या खांद्यावर पडल्याने, विभागात सावळागोंधळ निर्माण होऊन टक्केवारी व भ्रष्टाचाराची टीका होत आहे. महापालिकेचे महत्वाचे शहर अभियंता पद, बांधकाम, विधुत व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद, मालमत्ता कर निर्धारक, एकून ४ साहाय्य आयुक्त पद, विधी अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, वाहन व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, सहायक नगररचनाकार संचालक आदी ८० टक्के पदे रिक्त आहेत.
महापालिकेच्या वर्ग-१ व २ च्या अधिकारी पदाची जबाबदारी लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिल्याने, बहुतांश विभागात सावळागोंधळ निर्माण झाला. प्रभारी वाहन व्यवस्थापक पदाचा प्रभारी पदभार कर्मचारी यशवंत सगळे यांच्याकडे देण्यात आला. यशवंत सगळे याने कंत्राटी वाहन चालकांचा वेळेत पगार काढण्यासाठी व इतर सुखसुविधा देण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. प्रत्येक कंत्राटी वाहन चालकाकडून दरमहा ३ हजार रुपये घेतले जात असल्याचे बोलले जाते. विभागात तब्बल ५६ कंत्राटी वाहन चालक आहेत. याशिवाय पाणी पुरवठा विभागात वॉलमन, जलशुद्धीकरण केंद्र, भुयारी गटार गाडीसह , सुरक्षा बोर्डा कडून घेतलेले सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाच्या अग्निशमन कर्मचारी असे शेकडी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर महापालिका कामात आहेत. तसेच वाहतूक विभागाला ४६ वॉर्डन दिले.
शहर अभियंता पद अनेक वर्षे रिक्त
शहर विकासासाठी महत्वाचे पद असलेले शहर अभियंता पद गेल्या ४ वर्षांपासून रिक्त आहेत. बांधकाम विभागातील उपअभियंता महेश शितलानी यांच्याकडे दोन पदाचा पदभार देण्यात आला. याशिवाय विभागाचे कार्यकारी अभियंता पदही देण्यात आले. दरम्यान त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा टाकल्याने विभागात सावळागोंधळ उडाला. तसेच विभागात तीन कनिष्ठ अभियंते असून त्यांनाही इतर विभागाचा पदभार दिल्याने विभागाचे काम राम भरोसे असल्याची टीका होत आहे.