कल्याण : कल्याणनजीक असलेल्या श्री मलंग गडावर २७ एप्रिल रोजी जाऊन महाआरती करणार असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले होते. मात्र, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय स्थगित केल्याचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी सहायक पोलीस आयुक्तांना कळविले आहे.
श्री मलंग गडावर मच्छिंद्रनाथाची समाधी असल्याने होळी पौर्णिमेस त्या ठिकाणी आरती केली जाते. होळीच्या पौर्णिमेस आरती करताना एका समाजबांधवांस अन्य समाजाकडून मज्जाव करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन समाज गटाच्या परस्पर विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हा प्रकार कळताच मनसेचे नेते जाधव हे गडावर आरती करण्यासाठी निघाले असताना त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका झाली. मात्र,जाधव यांनी २७ एप्रिल रोजी पुन्हा गडावर जाऊन महाआरती करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आरतीचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. कोरोना लाट ओसरल्यावर गडावर जाऊन आरती करण्यात येणार असल्याचे शिर्के यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
---------------