ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असून नागरिकांच्या डोळ्यांत पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. या महागाईने होरपळलेल्या चोरट्यांनीही आता किमती वस्तूंऐवजी ठाणे भाजी मार्केटमध्ये कांदे-बटाट्यांच्या चोरीवरही भर दिल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत ठाणेनगर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी नोंदवल्या जात होत्या. त्यानुसार, पोलिसांनी गस्त वाढविल्याने त्यांच्या सापळ्यात कांद्याची ६० किलो वजनाची गोणी चोरून नेणारी दुककल शुक्रवारी हाती लागली. ते दोघेही भुरटे चोरटे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.एम. सोमवंशी यांनी दिली.शहरात घडणाऱ्या मोबाइल, सोनसाखळी आणि पाकीटमारी यासारख्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात केली जात आहे. त्यातच नागरिकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आणि त्याचा जोडीदार असलेला बटाटा या दोन्हींची काही किलोंमध्ये चोरी होत असल्याने ठाणे भाजी मार्केटमधील विक्रेत्यांमार्फत पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी येण्यास सुुरुवात केली होती. हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढू लागल्याने पोलिसांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील दोन ते तीन दिवसांपासून चोरट्यांवर वॉच ठेवला. त्यानुसार, शुक्रवारी रात्री ठाणे भाजी मार्केटमधून कांद्याची ६० किलो वजनाची गोणी चोरून नेणाºया कळव्याच्या महात्मा फु लेनगर येथील अविनाश कदम (३०) आणि अशोक पवार (३१) हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. चोरी झालेल्या गोणीची बाजारभावाप्रमाणे चार हजार ८०० रुपये इतकी किंमत आहे.आरोपींना न्यायालयात केले हजरते दोघे भुरटे चोर असून ते चोरलेल्या कांद्याची विक्री करून येणाºया पैशांचा वापर नशेसाठी करणार होते. या पकडलेल्या दुकलीमुळे कांदा-बटाटाचोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांकडून वर्तवला जात आहे. तसेच त्या दोघांना न्यायालयात हजर केले असून त्या दोघांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ठाण्यात नशेसाठी चक्क कांदे- बटाट्यांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 3:27 AM