- राजू ओढेठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पश्चात त्याच्या साम्राज्याचा वारसा त्याचा भाऊ इक्बाल कासकरला मिळण्याची शक्यता आहे. दाऊदचा हा निरोप त्याच्या कुटुंबीयांनी इक्बालपर्यंत गेल्या महिन्यात पोहोचविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.खंडणीच्या ३ गुन्ह्यांमध्ये ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे २ हस्तक आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना सप्टेंबर २0१७ मध्ये अटक केली. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. चौकशीच्या दरम्यान इक्बाल कासकरने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साम्राज्याविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली. दुबई येथे वास्तव्यास असलेला इक्बालचा मुलगा मो. रिझवान आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिस यांनी गत महिन्यात इक्बाल कासकरची ठाण्यात भेट घेतली. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. ती मो. रिझवानची पत्नी असल्याची चर्चा आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांकडे ठोस माहिती नाही.पोलिसांना तिच्या पासपोर्टची छायांकित प्रत मिळाली असून, त्यावर तिचे जन्मस्थान नाशिक असल्याचे म्हटले आहे. या तिघांनी इक्बाल कासकरची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाची स्वत:हून चौकशी केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही मुंबई विमानतळाजवळ असलेल्या हॉटेल बावा इंटरनॅशनलमध्ये ३ दिवस मुक्कामी होते. २४ ते २६ डिसेंबर २0१७ दरम्यान ते या हॉटेलमधील रूम क्रमांक १0५ मध्ये थांबले होते. हॉटेलचे बुकिंग मो. रिझवानच्या नावावर करण्यात आले होते. निवासी पुरावा म्हणून त्याने पासपोर्टची छायांकित प्रत दिली होती. या भारतीय पासपोर्टची प्रत पोलिसांनी हस्तगत केली आहे. हॉटेलमध्ये केवळ १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज साठवून ठेवण्याची व्यवस्था असल्याने पोलिसांना ते मिळू शकले नाही. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलमध्ये दरी निर्माण झाल्याचे वृत्त मध्यंतरी गुन्हेगारी जगतात होते. याशिवाय दाऊदचा मुलगा मोईन धार्मिक मार्गाला लागला आहे. कराचीतील एका मशिदीमध्ये तो धार्मिक शिकवण देत असतो. त्याला डी. कंपनीमध्ये अजिबात रस नसल्याची चर्चा गुन्हेगारी जगतात आहे. त्या पार्श्वभूमीवर या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी या महितीला दुजोरा दिला नसला, तरी खंडणही केले नाही.
कासकर दाऊदचा संभाव्य उत्तराधिकारी, डिसेंबर महिन्यात मिळाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 5:24 AM