कल्याण : खड्ड्यांमुळे होणाºया वाहतूककोंडीचा फटका एसटीच्या प्रवासी फेºयांना बसत आहे. प्रवासाची ठरलेली वेळ गाठता येत नसल्याने बसच्या कमी फेºया होतात. शिवाय, इंधनही अधिक जळते. या सर्व प्रकाराला कल्याण एसटी डेपोने २२ चालकांनाच जबाबदार धरत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या उफराट्या कारभारामुळे काम कसे करायचे, असा संतप्त एसटीचालकांचा सवाल आहे.एसटीच्या नियमानुसार, कल्याण-पनवेल मार्गावरील एसटी बसना प्रवासासाठी प्रतिफेरी एक तास १० मिनिटे लागतात. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होते. कल्याण- शीळ मार्गावर वाहनचालकांना नेहमीच कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर जाताना ७२, तर परतीच्या मार्गावर ६८ गतिरोधक आहेत. सध्या रस्त्याची चाळण व कोंडीमुळे एका फेरीला किमान पाच तास लागतात. त्यामुळे पुरेशा फेºया होत नाही. इंधन जळते. खड्डे व कोंडीला चालक जबाबदार नसतानाही कल्याण एसटी डेपो प्रशासनाने चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश भरनुके व सचिव महादेव म्हस्के यांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.संघटनेच्या मते, कल्याण-पनवेल या मार्गावर एसटी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जाण्यासाठी एक तास ४५ मिनिटे लागतात. मात्र, डेपोने हा अवधी का ग्राह्य धरलेला नाही. मध्यंतरी, कल्याण-माळशेज घाटरस्ता बंद होता. त्यामुळे चाकणमार्गे वाहतूक वळवली होती. त्यामुळेही इंधन व वेळ जास्त लागला. हा प्रकार केवळ कल्याण-पनवेल मार्गावर होत नसून अन्य मार्गांवरील चालकांनाही अशाच प्रकारे जबाबदार धरण्यात आले आहे. खड्डे बुजवण्याची मागणी न करता प्रशासनाने चालकांची कोंडी करत छळवाद सुरू केला आहे.चालक अनिल बारे यांनी सांगितले, एका चालकास सहा तासांची ड्युटी आहे. वाहतूककोंडी व खड्ड्यांमुळे त्याला १० तासांची ड्युटी करावी लागते. मात्र, प्रशासनाकडून केवळ सहा तासांच्या ड्युटीचीच नोंद केली जाते.गर्भवती-आजारी वाहक, महिलांना त्रासडेपोतील वाहक कांचन ठाकरे या गर्भवती आहेत. त्यामुळे त्यांनी हलके काम द्यावे. डेपोत बुकिंगचे काम द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, ते त्यांना दिलेले नाही. या पाठपुराव्यातच त्यांचे पाच महिने गेले आहेत. प्रशासन त्यांना रजा घेण्याचा सल्ला देत आहे. मात्र, आता रजा घेतली, तर बाळंतपणाची रजा कशी मिळणार, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.वाहक शीला गुजरकर यांना पाठीच्या मणक्याचा आजार आहे. त्यांनाही हलके काम हवे आहे. त्यांनाही ठाकरे यांच्याप्रमाणेच वागणूक दिली जात आहे. शीला वाघ यांचे तिकीट यंत्र बिघडले आहे. त्यांना ते दिलेले नाही. प्रशासन महिलांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते. धडधाकट वाहकांना डेपोतील बैठी कामे दिली जातात, असा आरोप या महिलांनी केला आहे.याप्रकरणी दाद मागणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने दिला आहे.डेपो व्यवस्थापक प्रतिभा भांगरे यांच्याशी संपर्क साधला, पण होऊ शकला नाही.
खड्डे, कोंडीचे खापर एसटीच्या चालकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:49 AM