कल्याण : कल्याणनजीक असलेल्या बदलापूर पाइपलाइन रोडवर पडलेले खड्डे बुजविण्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे सोमवारी बुजविले.
कल्याणनजीकचा बदलापूर अंबरनाथ हा पाइपलाइन रोड हा अंबरनाथहून कल्याण काटईच्या दिशेने येतो. काटई सर्कलवर हा रस्ता येऊन मिळतो. हा रस्ता काही ठिकाणी डांबरी, तर काही ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटचा आहे. या रस्त्यावर नवी मुंबईच्या दिशेने काटई मार्गे जाण्यासाठी, तसेच खोणी तळोजा मार्गे पनवेलला जाण्यासाठी वाहनांची एकच वर्दळ असते. हा रस्ता एमआयडीसीच्या अखत्यारित येतो. मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम एमएमआरडीएच्या अखत्यारित येते. येथील डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात. त्यामुळे वाहतूक पोलीस अधिकारी शहाजी शिरोळे आाणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चातून खड्ड्यांत खडी टाकून ते बुजविले आहेत. पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेनंतर प्रशासनाला आता तरी जाग येणार आहे की नाही, असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
-----------------------