- नितीन पंडितभिवंडी - शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली.जून महिन्यात झालेल्या पावसात भिवंडी शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते.या वाहतूक कोंडीची सोडवणूक करताना वाहतूक पोलिसांची दमझाक होत आहे. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलीस खड्डे भरण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
भिवंडी शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्यावर स्व. राजीव गांधी उड्डाण पुलाच्या सुरुवातीला रस्त्यावर असलेले खड्डे भरण्यासाठी पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना वाहतूक पोलीस संभाजी थोरात यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काही युवकांच्या मदतीने या खड्ड्यांमध्ये दगड विटांचा खच असलेल्या गोणी ठेऊन येथील खड्ड्यांवर मलमपट्टी केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या सेवाभावी कार्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्या कामाची प्रशंसा होत आहे.