मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून यंदा बाप्पाचे आगमन आणि विसर्जन खड्ड्यातूनच होत असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या टक्केवारी आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचे परिणाम असून नागरिकांना मात्र खड्ड्यांचा जाच पाचवीला पुजला असल्याचे आरोप होत आहेत.
मीरा भाईंदरमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासुन शहरातील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांवर लहान - मोठे खड्डे पडले आहेत. हटकेश - मंगलनगर, डोंगरी , एमआयडीसी आदी काही ठिकाणी तर रस्त्यांवर खड्डे नव्हे तर रस्तेच खड्डय़ात गेले आहेत अशी स्थिती आहे. गणोशाच्या आगमना आधी रस्त्यातील खड्डे बुजवा असे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बैठक घेत त्याचे प्रसिद्धी पत्रक काढून सांगितले होते. पण ते सर्व केवळ कागदावरच राहिले.
काही प्रमुख मार्गावर आधी केलेले पॅचवर्क सुद्धा पुन्हा उखडू लागले आहे. पॅचवर्कसाठी पालिकेने कित्येक कोटींचे कंत्राट दिले आहे. पण कामे नीट होत नसल्याने पॅचवर्क टिकत नाही. पॅचवर्कच्या आड तर काही ठिकाणी रस्ताच बनवला जातो. खड्डा छोटा पण पॅचवर्क भला मोठा असे बिल वाढवण्याचे प्रकार चर्चेला येतात. वास्तविक डांबराचे पॅचवर्क पावसाळ्यात टिकत नाही याची कल्पना असताना देखील महापालिकेने पॅचर्कची डांबरी कामे करुन घेतली. जेणे करुन पॅचवर्क केलेल्या जागी पुन्हा डांबर व खडी निघुन मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
रस्ते उखडून निघणारी खडी, चिखल यामुळे पादचारी नागरीक तसेच वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत. वाहतुक कोंडी वाढली असुन वाहनांचे दुरुस्ती काम निघुन नुकसान होत आहे. चालकांसह प्रवाशांचे खड्डय़ां मुळे पाठ, मणका, कंबर व मानेचे दुणो वाढले आहे. त्यातही गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरीक, रुग्ण यांना जास्त त्रास सहन करावा लागतोय. खडय़ात पाणी व चिखल साचल्याने चालकांना अंदाज येत नाही. दुचाकी चालक पडुन अपघाताची भिती आहे. काशिमीरा येथे तर खड्डा चुकवताना एका तरुणाचा बळी गेल्याची घटना घडली होती.
मुळात टेंडर आणि टक्केवारी मुळे रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत. काम करताना साहित्य, दर्जा व तांत्रिक बाबी कडे काटेकोर लक्ष दिले जात नाही. पॅचवर्कचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केल्या मुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे आरोप केले जात असतात. या प्रकरणी ठेकेदारासह संबंधित अधिकारी तसेच यात गुंतलेल्या लोकप्रतिनिधीं बाबतची सखोल चौकशी करुन कारवाईची मागणी अनेकवेळा केली गेली आहे. पण तांत्रिक मुद्द्यांवर तक्रारदारांची बोळवण करून प्रकरण गुंडाळली जाण्याचे प्रकार होत असतात. एमएमआरडीएच्या माध्यमातून झालेल्या मुख्य रस्त्याच्या कामा दरम्यान काही भागात डांबरीकरण अर्धवट झाल्याने रस्ता खराब झाला होता. त्यावेळी सत्ताधारी भाजपाने शासना वर राजकीय निशाणा साधला. पण शहरातील पालिकेच्या खड्डेमय रस्त्यांमुळे सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठली आहे.