- नारायण जाधव ठाणे : आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असून, समाजातील सर्व घटकांच्या मागण्या मान्य केल्या जातील, असे सूतोवाच केले होते. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून आता राज्यातील माती कलेला उत्तेजन देण्यासाठी, संत गोरोबा काका यांच्या नावाने मातीकला बोर्ड स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे.मातीकला बोर्ड स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बारा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कल्याण पश्चिमचे भाजपा आमदार नरेंद्र पवार यांचा समावेश आहे. या बोर्डाच्या माध्यमातून सरकारचा ओबीसी समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या कुंभार समाजास कुरवाळण्याचा प्रयत्न दिसत आहे.कुंभार समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेचे अध्यक्ष आणि वर्धा येथील नेते संजय गाते यांनी सांगितले की, समाजातील कारागिरांना मातीकला बोर्डच्या माध्यमातून प्रशिक्षण, उत्पादन, मार्केटिंगबाबत मदत करून मॉनिटरिंग केली जाईल. उत्पादनासाठी कर्जपुरवठा, बाजारपेठ, मशिनरी, जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाईल. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येईल. कर्जाचे हप्ते नियमित भरले जातात की नाहीत, यावरही लक्ष ठेवण्यात येईल. राज्यातील इतर महामंडळांसारखी मातीकला बोर्डची अवस्था होऊन ते डबघाईस जाऊ नये, यासाठीचा हा प्रयत्न राहणार आहे.>रोजगारासाठी मदत : राज्यात सुमारे ६० लाखांवर कुंभार समाजबांधव असून तो रोजगारासाठी चाचपडत आहे. त्यांना या मातीकला बोर्डच्या माध्यमातून एकत्र आणून मदत करणार आहे. सध्या मातीच्या वस्तूंना सर्वत्रच मागणी वाढत आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही मातीचे महत्त्व सिद्ध झाले आहे. त्या दृष्टीने हे बोर्ड काम करणार असून, त्याबाबत ही समिती आपल्या आपल्या शिफारसी सरकारला देणार आहे.>समितीत यांचा समावेशया समितीतील अन्य सदस्यांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी असलेले डोंबिवलीचे शरद वाडेकर, वर्धा येथील संजय गाते, कोरेगांववाडी, उस्मानाबादचे नागनाथ रेवणप्पा कुंभार, दासगाव जिल्हा बीडचे बापूराव वाघुंबरे, उद्योग संचालनायाचे उपसंचालक, महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योग मंडळाचे प्रतिनिधी आणि मंडळाचेच उपमुख्य अधिकारी यांचा समावेश आहे.
कुंभार समाजाला खूश करण्यासाठी मातीकला बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 5:31 AM