भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी झाल्या. कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे नवे उपमहापौर असून, सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेनेला यामुळे जोरदार हादरा बसला आहे.भिवंडी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु वारी दुपारी १२ वाजता निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे रिषिका राका आणि भाजप-कोणार्क विकास आघाडीतर्फे प्रतिभा पाटील रिंगणात होत्या. पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान करण्याच्या सूचना केल्या. या मतदान प्रक्रि येत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय (एकतावादी), समाजवादी पक्ष आणि भाजपबरोबरच काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी कोणार्कच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या ४९ मतांनी विजयी झाल्या. शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या उमेदवार रिषिका राका यांना ४१ मते मिळून आठ मतांनी त्यांचापराभव झाला. विशेष म्हणजे,भिवंडी महापालिकेत काँग्रेसचेएकूण ४७ नगरसेवक आहेत. त्यापैकी १८ नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीशी घरोबा केल्याने काँग्रेसचा दारु ण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेला पायउतार व्हावे लागले आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजप आणि कोणार्क विकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना ४९ मते मिळाली. त्यांनी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला. चौधरी यांना ४१ मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून भाजप-कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.चार सदस्यीय कोणार्कच्या हाती पालिकेची सत्ताभिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक असून, त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्क विकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसकडे बहुमत असूनही नगरसेवक फुटण्याची शक्यता लक्षात घेता २०१७ मध्ये काँग्रेसने शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन सेनेला सत्तेत वाटा दिला होता. त्यामुळे भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप-कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आजच्या निवडणुकीत भाजप-कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे.
भिवंडी महापालिकेत सत्तांतर; काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटले, महापौरपदी कोणार्कच्या प्रतिभा पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 1:41 AM